दरम्यान गेल्या ४ दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. कोकणात विशेषतः तळकोकणात गेले २ दिवस धो-धो पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील ३ दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून १५ ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
वेळेआधी आगमन – अवकाळी पावसाने झोडपून काढले असताना आणि शक्ती चक्रीवादळ घोंघावत असताना मान्सूनचे वेळेआधी आगमन होण्याचे संकेत मिळत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस मान्सून कोकणपट्टी काबीज करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. येत्या रविवारी २५ मे ला मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणे अपेक्षित आहे. भारतीय कालगणनेनुसार २५ मे ला रोहिणी नक्षत्र सुरू होते आणि रोहिणीचा पाऊस पडतो व तो आगामी मान्सूनचे संकेत देतो असे जाणकार सांगतात. यावर्षी तर २५ मे ला मोसमी पाऊसच दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
अतिवृष्टीची शक्यता – हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून या आठवड्यात केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रातील कोकण आणि गुजरातपर्यंत धडकणार असून या सर्व ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
शक्ती चक्रीवादळाचा धोका – अवकाळी पावसाने झोडपले असतानाच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने नवे संकट येण्याची शक्यता आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचा परिणाम म्हणून गेले दोन दिवस कोकणात मुसळधार पर्जन्यवृष्टी होते आहे. हा कमी दाबाचा पट्टा गेले दोन दिवस कायम असून येत्या ३६ तासांत तो अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर शक्ती चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने सरकेल असा अंदाज असून कोकण किनारपट्टीला त्याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी, रायगडला रेड अलर्ट – या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील, तसेच काही भागांत अतिवृष्टीची शक्यताही नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह उर्वरित कोकणात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तिनही राज्यांतील मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये, समुद्र खवळलेला आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जाहीर झाला असून प्रशासनाकडून आपत्कालीन उपाययोजना सुरू झाल्या आहेत.