गेले २-३ दिवस धो-धो कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने रत्नागिरी शहराजवळील काजिरघाटी बौध्दवाडीतील एका झोपडीवर दरड कोसळल्याने एका लहान मुलासह ३ जण जखमी झाले असून ऐन पावसात गरीब कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. एकूण ५ झोपड्याचे यामध्ये नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवीतहानी टळली असली तरी झालेले आर्थिक नुकसान लक्षात घेऊन शासनाने या कुटुंबाला मदत करावी अशी मागणी होते आहे. गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळली. रत्नगिरीजवळच्या काजिरघाटी बौध्दवाडीतील प्रविण राठोड यांच्या आवारात त्यांचे काही कामगार झोपड्या बांधून राहतात. प्रविण राठोड हे ठेकेदार आहेत. ८ ते १० झोपड्या याठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी या झोपड्या उभारण्यात आल्या असून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे गुरूवारी सायंकाळी एक दरड पाण्याबरोबर घरंगळत खाली आली आणि एका झोपडीवर कोसळली. त्यावेळी या झोपडीत आशाबाई अमर राठोड (वय ४२), मोहन किसन राठोड (वय २) आणि रोहन जाधव (वय १७) हे होते. ते तिघेही जखमी झाले असून त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
८ ते १० झोपड्या – ८ ते १० झोपड्या या परिसरात असून त्यामध्ये सुमारे १५ ते २० कामगार आणि त्यांचे कुटुंबिय राहतात. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने या झोपड्यांमध्ये कामगार मोठ्या संख्येने नव्हते. कामावरून परतण्याची ती वेळ होती. सायंकाळी ६.३० वा. ही दुर्घटना घडली. अनेक कामगार घरी न परतल्याने ते या संकटातून वाचले. हेच जर का रात्री घडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती असे परिसराची पाहणी केली असता गावकऱ्यांनी सांगितले.
३ जण जखमी – झोपडीवर दरड कोसळताच त्याखाली एक कामगार सापडला होता. त्याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. एकूण ३ जण जखमी झाली असून त्यांच्योवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान झोपड्या ज्या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत, ती जागा चुकीची आहे. त्यामुळे झालेली दुर्घटना लक्षात घेऊन पाऊस तोंडावर असल्याने संबंधितांनी सुरक्षितस्थळी या झोपड्या उभाराव्यात अशी मागणी होत आहे. एका झोपडीचे मोठे नुकसान झाले असून गरीबांचा संसार उघड्यावर पडला आहे. त्या कुटुंबियांना शासनाने मदत द्यावी अशीही मागणी केली जात आहे. रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच या कुटुंबियांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आता त्यांची सुरक्षितस्थळी राहण्याची व्यवस्था करायला हवी, अशी मागणी होत आहे.