शहराजवळील कर्ला-जुवे कीर बाग खारभूमी योजनेतील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एक किमीच्या या बंधाऱ्यामुळे कर्ला, जुवे गावात पावसाळ्यात शिरणाऱ्या समुद्राच्या उधाणाच्या पाण्यापासून संरक्षण होणार आहे. या बंधाऱ्याची सुमारे साडेचार मीटर उंची वाढवली आहे. सुमारे ४ कोटी २३ लाखांचे हे काम असून, जुवे येथे पहिल्या टप्प्याचे काम जोरात सुरू आहे. कर्ला खारभूमी योजनेंतर्गत कर्ला बंधारा व जुवे कीर योजनेचा बंधारा १९८४ मध्ये पूर्ण करण्यात आले. यामध्ये कर्ला बंधाऱ्याची लांबी ६१० मी. इतकी व जुवे कीर बंधाऱ्याची लांबी ४७३ मी. इतकी असून, एकूण लांबी १०८३ मी. आहे. योजनेच्या माती बंधाऱ्यास खांडीकडील व शेतीकडील बाजूस उतार देण्यात आला आहे. कर्ला खारभूमी योजनेचे एकत्रित संरक्षित क्षेत्र ७५ हेक्टरइतके आहे.
सर्व ७५ हेक्टर क्षेत्रास सागरी नियमन कायदा १९९१ नुसार सूट आहे. कर्ला खारभूमी योजनेच्या जुवे कीर बंधाऱ्याची रुंदी व उंची वाढवण्याच्या कामासाठी मुख्य अभियंता कोकण प्रदेश (मुंबई) यांनी १९ लाख २५ हजार ९४ इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली. गुहागरच्या ठेकेदाराने हे काम घेतले; परंतु ठेकेदाराने विहित मुदतीत तसेच मुदतवाढ घेऊन देखील काम पूर्ण केले नाही. त्यामुळेच २८ फेब्रुवारी २०१३ ला ठेकेदाराने केलेल्या कामाची मापे घेऊन निविदेतील अटी व शर्तीनुसार अनामत रक्कम जप्त करून काम काढून घेण्यात आले. ठेकेदाराने पूर्ण न केल्यामुळे कर्ला खारभूमी योजनेचा जुवे कीर बंधारा धोक्यात आला. या बंधाऱ्याचा खाडीकडील बाजूचा बहुतांश लांबीमधील भराव पूर्णपणे वाहून गेल्याने बंधारा कमकुवत झाला. तो वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली.
२०२०च्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थितीने तसेच भरतीच्या पाण्यामुळे जुवे कीर बंधारा वाहून जाण्याची स्थिती निर्माण झाली होती. या वेळी खाडीचे पाणी बंधाऱ्यावरून शेतीकडील भागामध्ये शिरल्याने वस्तीलाही धोका निर्माण झाला होता. त्याबाबत ग्रामस्थांनी आमदार उदय सामंत यांना जुवे कीर खारभूमी योजनेचे नुतनीकरण करून उंची वाढवून मिळावी, अशी मागणी केली. त्यामुळे उदय सामंत यांच्या पुढाकारातून तातडीचे हे काम असल्याने कर्ला खारभूमी योजनेचे नुतनीकरण करण्याचे अंदाजपत्रक प्रस्तावित करण्यात आले. ४ कोटी २३ लाखांचा निधी राज्य आपत्ती सौम्यीकरण निधी योजनेअंतर्गत मंजूर झाल्यामुळे आता या बंधाऱ्याचे युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. बंधाऱ्याची उंची चार मीटरने वाढवली आहे.