आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जनतेसाठी मनसे हा सक्षम पर्याय म्हणून नक्कीच पुढे येणार आहे. त्यासाठीच पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार संघटना बांधणीवर जास्त जोर देत आहोत, असे मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी रत्नागिरीत कार्यकर्त्यांशी चर्चा करताना सांगितले. रत्नागिरीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सूचना देताना ते म्हणाले, ‘जिल्ह्याच्या दक्षिण व उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व शहराध्यक्ष यांची योग्य मोट बांधून प्रत्येकाला आपापल्या कार्यक्षेत्रात भरीव योगदान देण्यासाठी आदेशित केले आहे. नेतृत्वाच्या आदेशानुसार जे अकार्यक्षम आहेत, पक्षात राहून गटबाजी करतात त्यांना तत्काळ बाजूला करून त्या ठिकाणी सक्षम कार्यकर्त्यांची नियुक्ती केल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक महिन्यात संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष ते उपशहराध्यक्ष व उपतालुकाध्यक्षापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली जाणार आहे.
त्या बैठकीचे आयोजन ठरवून दिलेल्या क्रमाने प्रत्येक तालुक्यात केले जाईल. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साह निर्माण होईल आणि ते जोमाने कामाला लागतील. गेल्या काही दिवसांमध्ये त्याचे सकारात्मक बदल दिसत आहेत. अनेक तालुक्यात पक्ष संघटना मजबूत होतेय. अनेक कार्यक्रम, आंदोलनं, प्रवेश इत्यादी गोष्टी घडताना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात देखील जनता मनसेसोबतच आहे हे दिसत आहे, असे मनसे सरचिटणीस खेडेकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील संपर्क वाढवला – खेडेकरांचे दक्षिण रत्नागिरीकडेही लक्ष मनसेची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला विद्यमान सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी जिल्ह्यात सर्वत्र दौरे करत संघटना बांधणी केली होती. बेरोजगारीसह विविध विषय त्यांनी हाताळले होते; मात्र कालांतराने त्यांचा जिल्ह्याच्या दक्षिणेकडील संपर्क कमी होत गेला. नवीन नेतृत्वांमुळे खेडेकर हे उत्तर रत्नागिरीत सर्वाधिक कार्यरत दिसू लागले. गेल्या काही दिवसांत रत्नागिरी तालुक्यातील पदाधिकारी नेमणुकीच्या निमित्ताने खेडेकर यांनी चर्चा करत आगामी निवडणुकीसाठी मनसे सक्षम करण्याचा नारा दिला आहे.