शहरासाठीच्या सुधारित योजनेचे दुष्टचक्र संपलेले नाही. नव्या योजनेच्या जलवाहिन्या वारंवार फुटण्याचा प्रकार सुरूच आहे. दोन ते चार दिवसात तीन ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या. आता काँक्रिटीकरणामुळे फुटलेल्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम करताना पालिका कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. शहरातील मारूती मंदिर येथे फुटलेली जलवाहिनी शोधण्यासाठी काँक्रिटच्या रस्त्याच्याकडेला खोदाई करावी लागली. खोदाई केल्यानंतर काँक्रिट रस्त्याखाली जलवाहिनी फुटल्याचे दिसले. दुरुस्तीसाठी काँक्रिटच्या रस्त्याच्याकडेला बोगदा खोदून तेथील दुरूस्ती करण्याची नामुष्की पालिकेवर आली. रत्नागिरी शहरात जयस्तंभ, मारूती मंदिर येथे नाचणेकडे जाणाऱ्या मार्गावर आणि विशेष कारागृहाच्या समोर जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडत आहेत. पालिकेच्या समोरील जलवाहिनी तर तीन ते चारवेळा फुटली. यावरून या पाणीयोजनेच्या कामाच्या दर्जाकडे बोट केले जात आहे; परंतु त्यावर पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.
दुरूस्तीचे जी कामे होत आहेत ती ठेकेदाराच्या अनामत रक्कमेतून घेतली जाणार, असे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात काहीच झालेले दिसत नाही. डांबरीकरणाचे रस्ते असताना ही दुरूस्ती ठीक होती; परंतु आता काँक्रिटीकरणामुळे जलवाहिनी फुटल्यास दुरूस्तीची डोकेदुखी वाढली आहे. या ठिकाणी रस्त्याची खोदाई करूनच जलवाहिनी दुरूस्ती करावी लागते. त्यामुळे या तीन ठिकाणच्या रस्त्यावर मातीचा थर किंवा ज्या ठिकाणी दुरूस्तीनंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे तेथे रस्ता खचलेला दिसतो. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी रामआळी जलवाहिनी फुटली होती. तेथे दुरूस्ती करण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. त्या ठिकाणी मातीचा थर आहे तसाच आहे. मारूती मंदिर येथे फुटलेली जलवाहिनी शोधण्यासाठी रस्त्याच्या कडेला खोदाई करावी लागली. खोदाई केल्यानंतर काँक्रिट रस्त्याखाली जलवाहिनी फुटल्याचे आढळून आले. त्यामुळे रस्त्याच्याकडेने काँक्रिटखाली बोगदा खोदून तेथील दुरूस्ती करावी लागली.