मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉलच्या लगतची माती जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा वाहून गेली असून, यामुळे संबंधित भिंतीला धोका निर्माण झाला आहे. परिणामी, या भिंतीच्या कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, घाटमाथ्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या वेगाने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे टेंशन वाढले असून यातून मार्ग काढण्यासाठी स्थानिक प्रशासन व महामार्ग प्राधिकरण यांची कसोटी लागणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात परशुराम घाट हा अपघातप्रवण व भूस्खलनाचा केंद्रबिंदू ठरत असतो. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घाटाच्या सुरक्षिततेसाठी गॅबियन वॉल बांधणीसह लोखंडी जाळी बसविण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून ४ महिने हे काम युद्धपातळीवर करण्यात आले. मात्र, अवकाळी पावसामुळे अनेक भागांतील काम अपूर्ण राहिले आणि काही ठिकाणी माती वाहून जाण्याचे प्रकार घडले.
नुकत्याच झालेल्या जोरदार पावसात घाटाच्या डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात पाणी आणि माती गॅबियन वॉलजवळ जमा झाली. परिणामी, वॉलच्या मुळाशी असलेली माती वाहून गेली असून, संपूर्ण रचनेवर ताण निर्माण झाला आहे. यामुळे भिंतीच्या कोसळण्याचा धोका वाढला आहे. या घटनेमुळे परशुराम घाट पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग विभागासाठी डोकेदुखी ठरतोय. स्थानिकांकडूनदेखील कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, भूस्खलन रोखण्यासाठी अधिक परिणाम कारक आणि शाश्वत उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे. स्थानिक प्रशासन व महामार्ग प्राधिकरण यांची कसोटी लागणार आहे. या परिस्थितीत घाटातील वाहतूक सुरळीत ठेवत असताना नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे रक्षण करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरत आहे. नागरिकांनीही पावसाळ्यात घाटातून प्रवास करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.