तालुक्यातील खोपी येथील डुबी नदी किनाऱ्याजवळील भातशेतीसह काही भाग वाहून गेल्यामुळे किनाऱ्यावरील तीन वाड्यांना धोका निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी आणि नदीपात्रातील गाळ काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खोपी येथे डुबी नदीवर धरण बांधण्यात आले आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्यानंतर त्यापासून धरणाच्या पायथ्याशी असलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पात पाणी सोडण्यात येते. गतवर्षी धरणाच्या सांडव्याची संरक्षक भिंत कोसळून धरणाच्या मुख्य भिंतीचा मोठा भाग नदीपात्रात वाहून गेला होता.
अतिवृष्टीमुळे याच कालावधीत नदीतील सर्वात मोठे खोल डोह नदीत आलेल्या भिंतीच्या गाळाने भरून गेले. नदीचे पात्र विस्तारल्यामुळे किनाऱ्यावरील गावातील कदमवाडी, सुतारवाडी व बौद्धवाडी येथील सुमारे ३०० लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रातील भोवरा डोह या ठिकाणी अनिल कदम या शेतकऱ्याची भातशेती जमीन नदीच्या प्रवाहाने गिळंकृत केल्यामुळे यावर्षी त्यांना भातशेती करता आली नाही तर नदीपलीकडच्या किनाऱ्यावरील तीन ते चार एकर भातशेतीतील जमिनीत गाळ येऊन पडल्यामुळे ही जमीन नापीक झाली आहे.
भोवरा डोहाच्या किनाऱ्यावर कदमवाडीतील दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. खोपी गावातील नदीकिनारी असलेल्या तीन वाड्यांमध्ये सध्या असलेली भातशेतीची जमीन वाचवायची असल्यास नदी किनारी मजबूत संरक्षक भिंत उभारणे आवश्यक आहे. याबाबत खोपी ग्रामस्थांनी पालकमंत्री सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.