शहर व परिसरात धोकादायक बनलेली तीसहून अधिक झाडे तसेच अनेक फांद्या तोडण्यात आल्या आहेत. पालिकेच्या आवाहनाला शहरातील खासगी जमीन मालकांनीही प्रतिसाद दिला. यामुळे यावर्षीच्या पासाळ्यात झाडे पडून, फांद्या तुटून होणारे नुकसान काही अंशी कमी होणार आहे. कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतो. अतिवृष्टी काळात रस्त्याकडेची मोठी झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटून वीजवाहिन्यांसह घरांचे नुकसान होते, शिवाय वाहतुकीवरही त्याचा विपरित परिणाम होतो. याचे जीवित आणि वित्तहानीही होण्याचे धोके अधिक असतात.
या घटना टाळण्यासाठी दरवर्षीच्या एप्रिल व मे महिन्यांत चिपळूण पालिकेमार्फत शहरातील धोकादायक झाडे, फांद्या तोडण्याचे काम हाती घेतले जाते. गेल्या काही वर्षांपासून नगर पालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख प्रसाद साडविलकर या कामाचे नियोजन करीत आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही चिपळूण पालिकेतर्फे धोकादायक झाडे आणि फांद्या तोडण्याचे काम हाती घेण्यात आले.
मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी २० मालकांना उद्यान विभागाचे प्रमुख प्रसाद साडविलकर यांच्या माध्यमातून नोटीस देत पावसाळा सुरू होण्याआधी धोकादायक झाडे व फांद्या तोडाव्यात, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार १५ जणांनी कार्यवाही केली असून, उर्वरित पाच नागरिकही झाडे तोडणार आहेत. दरम्यान, शहरातील पेठमाप भागात २५ वर्षे जुनी आंबा व शेवरीची झाडे होती. या दोन्ही झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या. त्यामुळे या भागातील संभाव्य धोके टाळता येण शक्य झाल्याने परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.