दापोलीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे २९ रोजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण करण्यासाठी शहरात येणार आहेत, अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी माध्यमांना दिली होती. मात्र नगर पंचायतीने २६ रोजी लोकार्पण करण्याची तारीख ठरविल्याने ना. आदित्य ठाकरे दापोलीत येणार कि नाहीत, याबाबत साशंकता दिसून येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून सुरू असलेले शिवसेनेचे अंतर्गत राजकारण अद्याप संपलेले नाही. आमदार कदम यांनी जाहीर केलेल्या तारखेपूर्वीच अनावरण करण्याचा घाट दापोली तालुका शिवसेनेने नगरपंचायतीच्या साथीने घातला होता. या वादात आता माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी उडी घेतली असून त्यांनी या पुतळ्याच्या अनावरणाची नवीनच तारीख जाहीर करून वादात भर घातली आहे. त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होणार की नाही याबाबतच नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
पुतळा अनावरण कार्यक्रम हा नगर पंचायतीला डावलून आमदार करत असल्याचा आरोप नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी केला आहे. परंतु, यावर महाआघाडीचे आमदार संजय कदम यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी बोलूनच पुतळ्याच्या लोकार्पणाची २६ मार्च हि तारीख निश्चित करण्यात आल्याचे सांगितले. आणि लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित केले जाणार आहे.
दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकानजिक उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवसेनेचे नेते व राज्याचे पर्यटन व पर्यावरणप्रेमी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ३० मार्चला करणार असल्याची माहिती माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी दिली. त्यामुळे कोणत्या गोष्टीसाठी किती राजकारण केले जाणार याबाबत नागरिकांमध्ये गहन चर्चा सुरु आहे.