मुंबई विद्यापीठामार्फत कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कायद्याच्या अभ्यासक्रमामध्ये अनेकदा पुस्तके इंग्रजी भाषेमध्ये विद्यार्थ्यांना मिळतात. त्यामुळे काही संकल्पना विद्यार्थ्यांना म्हणाव्या तशा स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे मराठी भाषेमध्ये पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी कुलगुरूंकडे मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे विधीचे शिक्षण सुलभ व्हावे यासाठी युवासेना सिनेट सदस्यांकडून विधी विद्यार्थ्यांच्या समस्या मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे मांडण्यात आल्या. त्या वेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडून विधीचे शिक्षण घेणाऱऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मराठी भाषेत विधी अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करण्याचे आश्वासन देण्यात आले.
राज्याच्या ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी विधीचे शिक्षण मराठीतून घेण्याला प्राधान्य देतात. मात्र मराठीमधून पुस्तके उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या अधिसभेमध्ये युवासेना सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात यांनी विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी कुलगुरूंसमोर मांडल्या आहेत.
मुंबई शहरातील काही महाविद्यालये सोडली तर विद्यापीठाच्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील बहुतांश विद्यार्थी हे विधीचा अभ्यास हा मराठीमधून करण्यावर भर देतात. मात्र या विद्यार्थ्यांसाठी बाजारामध्ये दोन ते तीन प्रकाशकांची पुस्तके उपलब्ध असल्याने त्यांना नोट्स काढणे व अभ्यास करणे अवघड जाते. अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या नोट्सचे मराठीमध्ये भाषांतर करावे लागते. अनेक विद्यार्थी हे जळगाव, परभणी, नांदेड, पश्चिम महाराष्ट्रात जाऊन तिकडून नोट्स आणतात. मात्र त्या नोट्ससुद्धा तुटपुंज्या असतात. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होताना दिसतो आहे. त्यामुळे मराठी भाषेमध्ये पुस्तके उपलब्ध झाली कि, विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच चांगला उपयोग होईल.