राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे हे गुरूवारी रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत असून विविध विकासकामांच्या उद्घाटनांनंतर ते शिवसैनिकांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत असून एका अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ गुरूवारी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे फोडतील, असे बोलले जात आहे. सातारा येथील दरेगाव येथून सकाळी ११ वा. त्यांचे रत्नागिरीमध्ये आगमन होईल. पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तारांगणाजवळ उभारण्यात आलेल्या कोकणातील भारतरत्न शिल्पाचे लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते होणार आहे. त्यानंतर ते रत्नागिरीतील आठवडा बाजार परिसरात उभारण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन करतील. गुरूवारी दुपारी १२.३० वा. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कचेरीमध्ये विविध विकासकामांचा आढावा घेणार आहेत. पालकमंत्री ना. उदय सामंत हे देखील त्यावेळी उपस्थित असतील.
शिवसैनिकांचा मेळावा – दुपारी २ वा. येथील सावरकर नाट्यगृहामध्ये शिवसैनिकांचा मेळावा होणार असून त्या मेळाव्याला ना. शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ते प्रचाराचा नारळ फोडतील, असे बोलले जात आहे. शिवसैनिकांना ते नेमके काय मार्गदर्शन करतात याकडे तमाम राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिंदेंच्या स्वागताची तयारी – शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

