25.1 C
Ratnagiri
Saturday, September 14, 2024

भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना…

क्रीडा क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा...
HomeMaharashtraदिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्री पदी वर्णी

दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्री पदी वर्णी

दिलीप वळसे पाटील यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल जाणून घ्यायचे तर, एकदम मृदुभाषी, कायद्यावर घट्ट पकड आणि शरद पवार यांचे अतिशय जवळचे. अनेक वर्षे ऊर्जा मंत्री म्हणून यांनी कार्यभार सांभाळला होता.

गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या १०० कोटीच्या लेटरबॉम्बने चांगलाच दणका दिला असून मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर देशमुख यांनी स्वत: आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू व अत्यंत जवळचे निष्ठावंत नेते दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्रीपदी वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा, असे विनंतीचे पत्र राज्यपालांना दिले होते, तसेच गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवीण्यात यावा, असाही या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी गृहखात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रथम सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसची आज सकाळी सिल्व्हर ओकवर मिटिंग पार पडली. या मिटिंगसाठी दिलीप वळसे पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रित उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच दिलीप वळसे पाटील हे माध्यमांसमोर व्यक्त झाले आहेत, गृहमंत्रीपदाची जबाबदारी मोठी आहे आणि ती पार पाडायला मला निश्चितचं आवडेल व आज दुपारी मी १. ३० वाजता मंत्रालयात जाऊन मी पदभार स्वीकारणार आहे, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रामध्ये, अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिना १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा दावा केला होता. याप्रकरणी अॅड. पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने निर्णय देताना सीबीआयने १५ दिवसांत गृहमंत्री देशमुख यांच्या वरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करावी, असे आदेश आज देण्यात आले व त्यानंतर काही कालावधीमध्येच अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

दिलीप वळसे पाटील यांचा शरद पवार यांचे खासगी सचिव ते राज्याचे नवीन गृहमंत्री असा प्रवास पार पाडला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले त्यावेळी मंत्रिमंडळ स्थापना करताना गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील यांचेच नाव शरद पवार यांच्या पहिल्या पसंतीत होते. परंतु, त्यावेळी वळसे पाटील यांच्या तब्येतीच्या काही कारणांमुळे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली नव्हती. त्यामुळे ही जबाबदारी अनिल देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आलेली.

दिलीप वळसे पाटील यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल जाणून घ्यायचे तर, एकदम मृदुभाषी, कायद्यावर घट्ट पकड आणि शरद पवार यांचे अतिशय जवळचे. अनेक वर्षे ऊर्जा मंत्री म्हणून यांनी कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या काळात लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्रची सुरुवात झाली. तसेच एक वर्ष त्यांनी अर्थमंत्री म्हणून कारभार सांभाळला. याबरोबरच वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती. दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्षपदाची जबाबदारी पाच वर्षे सांभाळली होती. त्यामुळे संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तसेच सर्व पक्षातील नेत्यांबरोबरही त्यांचे संबंध चांगले आहेत. अतिशय अडचणीच्या काळात ही शांतपणे काम करणे, प्रसार माध्यमांसमोर बाजू संयमाने मांडणे हे ही त्यांचे विशेष वैशिष्ट आहे.

गृह खात्यासारख्या विभागात विशेषतः सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर गृहखाते आणि पोलीस विभागात प्रचंड असुरक्षिततेच वातावरण निर्माण झाले आहे. वळसे पाटील यांच्या अंगावर अतिशय अडचणीच्या वेळी महत्वाची सोपविण्यात आलेली जबाबदारी ते कशी निभावतात याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular