कोकण रेल्वे मार्गावर काही दिवसांपूर्वी रोहा ते रत्नागिरी सीआरएस तपासणी यशस्वी झाल्यानंतर लगेचच पहिली मालगाडी विजेवर चालवण्यात आली. ही गाडी विना अडथळा धावल्यामुळे पुढे टप्प्याटप्प्याने प्रवासी गाडी चालवून पाहण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या पहिल्या गाडीचे सारथ्य करण्याचा मान रत्नागिरीचे लोको पायलट सचिन साळवी यांना मिळाला आहे. वर्षाकाठी डिझेलवर होणारा १०० कोटी रुपयांचा खर्च टाळण्यासाठी कोकण रेल्वेकडून विद्युतीकरणाचा प्रयत्न केला जात आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावली पहिली विजेवरील मालगाडी
रोह येथून १० वा. ५८ मी. गाडीने रत्नागिरीकडे प्रयाण केले व दुपारी २ वा. ५५ मी. विजेवर धावलेली पहिली गाडी रत्नागिरी स्थानकावर पोहोचली. मालवाहतूक गाडी चालवण्यात यश आल्याने आता लक्ष प्रवासी वाहतूक गाड्यांकडे वळविण्यात येणार आहे, त्यासाठी आता मार्ग सुकर झाला आहे. यामध्ये सुद्धा २ ते ३ चाचण्या करण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी यांना घेऊन प्रथम काही डबे आणले जातील, त्यानंतर काही प्रवाशांसह कमी डब्याची गाडी आणली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये विद्युतीकरणामुळे १० गाड्या विद्युत इंजिनासह चालवण्याचे नियोजित केले आहे. या गाड्यांमध्ये तुतारी, मांडवी, कोकणकन्या, मत्स्यगंधा, राजधानी, तसेच इतर सुपरफास्ट गाड्यांचा समावेश आहे.