शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुन्या बसस्थानकात फेरीवाल्यांसह व खासगी वाहने उभी केल्यामुळे चिपळूण आगारातून येणाऱ्या एस.टी. बसेस रस्त्यावरच उभ्या ठेवण्यात येत होत्या. ही बाब कोकण प्रवासी महासंघाने एसटी आगारप्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाने चिपळूण आगारात वाहने हटाव मोहीम राबवल्यामुळे बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला. जुन्या बसस्थानकातील वाहने हटाव मोहिमेमुळे कोकण प्रवासी महासंघाने आगारप्रमुखांना धन्यवाद दिले आहेत. याबाबत महासंघाचे पदाधिकारी म्हणाले, मध्यवर्ती आगार अंतर्गत चिपळूण बाजारपेठेत असलेल्या जुना बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय होत आहे. महामंडळाचे आणि एसटी अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमण होत आहे.
याबाबत गेल्या तीन वर्षांपासून महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. बसस्थानकातील प्रवाशांना उद्भवणाऱ्या समस्यांची जाणीव करून दिली. महामंडळाने पाठपुरावा केल्याने येथे वाहने हटाव मोहीम सुरू करण्यात आली. तसेच पुन्हा तिथे वाहने उभी करणार नाहीत, याकरिता एसटी वाहतूक अधिकारी लक्ष ठेवणार आहेत. प्रवाशांच्या विविध मागण्यांविषयी कोकण प्रवासी महासंघाने आगारप्रमुखांना निवेदन दिले. यावेळी संस्थापक वसंत भोसले, अध्यक्ष गणेश चव्हाण, उपाध्यक्ष दीपक शीरकर, कार्याध्यक्ष अनिलकुमार जोशी, खजिनदार अविनाश चव्हाण, चिपळूण संपर्कप्रमुख दिलीप चव्हाण, गुहागर संपर्क दत्ताराम जाधव, सल्लागार मनोहर साळवी, सत्यवान महापुस्कर आदी उपस्थित होते.
या समस्यांकडेही लक्ष द्या – जुन्या बसस्थानक इमारतीची अवस्था दयनीय झाली आहे. तिथे प्रवाशांना बसण्यास योग्य जागा नाही. प्रवासी इमारतीत न बसता शेजारी असलेल्या स्टॉलच्या पायरीवर बसत आहे. तेथेही घाणीचे साम्राज्य आहे. याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

