मंत्रिमंडळात सहभागी व्हायचे की नाही यावरुन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदेंचे नाराजी नाट्य रंगलेले पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर आता मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावरुन महायुतीत ओढाताण सुरु असल्याचे चित्र दिसत असून तोडीस तोड खात्यासाठी शिवसेना आग्रही आहे. दरम्यान शिवसेनेला गृह खाते देण्यास भाजपने स्पष्ट नकार दिल्याचे वृत्त असून त्या बदल्यात ३ खात्यांचा पर्याय देण्यात आला आहे. निकाल लागल्यानंतर १२ दिवसांनी गुरुवारी ५ डिसेंबरला सायंकाळी महायुतीचा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला. केवळ मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्र्यांनी शपथग्रहण केले. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्या असून त्यासाठी महायुतीमध्ये ओढाताण सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.
तोडीस तोड खाती हवीत ! – शिवसेनेने भाजपकडे तोडीस तोड खाती मिळावीत यासाठी आग्रह धरला आहे. उपमुख्यमंत्री पदासोबत गृह खाते मिळावे तरच शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी अट घालण्यात आली होती. मात्र गृहमंत्रीपदाची म ागणी भाजपने फेटाळून लावली असून त्याऐवजी अन्य खात्यांचा पर्याय ठेवला आहे.
भाजपचे ३ पर्याय – गृहमंत्रालयाच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपने ३ खात्यांचा पर्याय दिला आहे. त्यामध्ये महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा समावेश आहे. या तीनपैकी एक पर्याय शिवसेनेला निवडायचा आहे. मात्र शिवसेनेच्या अन्य मागण्यांबाबत विचार सुरु आहे. गृहनिर्माण, उर्जा आणि उत्पादन शुल्क ही खाती देखील शिवसेनेला हवी आहेत. गृहनिर्माण खाते मिळणे अवघड आहे.
महसूलवर तडजोड ? – गृहखाते नाकारल्याने शिंदेंना महसूल खाते दिले जाण्याची शक्यता आहे. महसूल खाते हे राज्यातील २ क्रमांकाचे खाते मानले जाते. ते स्वीकारण्यास शिंदे राजी असल्याचे बोलले जाते. याशिवाय उद्योग, सार्वजनिक आरोग्य ही खातीही पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाट्याला येतील. भाजप त्यांच्याकडे असलेले महसूल खाते शिवसेनेला देण्यास तयार आहे मात्र त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम खाते देखील शिवसेनेला हवे आहे. ते सोडण्यास भाजप तयार नसल्याची चर्चा सुरु आहे.
फडणवीस काय म्हणाले? – दरम्यान मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना पत्रकारांना सांगितले, गृह खाते, महसूल खाते यांना थोडे अधिक महत्त्व असते. महायुतीत ३ पक्ष आहेत. तिन्ही पक्षांना यथोचित सन्मान दिला जाईल मात्र गृह खाते देणार का? यो प्रश्नावर फडणवीसांनी स्मितहास्य करत काहीही बोलणे टाळले. जेव्हा निर्णय होईल तेव्हा सांगू असे त्यांनी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यावर स्पष्ट केले.
अजितदादांना अर्थ खाते – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते हवे आहे. त्यावरही शिंदेंनी दावा केला आहे. मात्र हे खाते राष्ट्रवादीलाच मिळेल अशी शक्यता आहे. त्याच जोडीला दादांकडे सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बाल कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण ही खाती मिळण्यांची शक्यता आहे.