25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriसडामिऱ्या-जाकीमिऱ्यात पोर्ट औद्योगिक क्षेत्र जाहीर…

सडामिऱ्या-जाकीमिऱ्यात पोर्ट औद्योगिक क्षेत्र जाहीर…

लॉजिस्टिक पार्क हे एक औद्योगिक क्षेत्र आहे.

शहराजवळील सडामिऱ्या- जाकीमिऱ्या भागातील १७६.१४९ हेक्टर खासगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१’अन्वये भूसंपादन कार्यवाही करण्याबाबतची अधिसूचना २९ जुलैला जारी झाली आहे. विविध वस्तूंच्या स्टोरेज, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी या क्षेत्राचा विकास होणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगक्षेत्राला चालना मिळावी, नवे उद्योग यावेत यासाठी प्रत्येक तालुक्यात औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी राजापूरची घोषणा झाली होती. आता मिऱ्या येथील सडामिऱ्या-जाकीमिऱ्या येथील खासगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. लॉजिस्टिक पार्क हे एक औद्योगिक क्षेत्र आहे, जे विशेषतः विविध वस्तूंच्या स्टोरेज, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी, पॅकेज करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी उभारले जाते. त्यासाठी १७६.१४९ हेक्टर क्षेत्र भूसंपादित करण्यात येणार आहे. खासगी क्षेत्रास ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१, प्रकरण- ६’च्या तरतदी लागू केल्या आहेत.

हे क्षेत्र कलम-२ खंड (ग) नुसार अधिसूचित करण्याच्या प्रस्तावास अधिनियमाच्या कलम ३२(१) खालील अटींच्या अधीन राहून क्षेत्र अधिसूचित करण्यास शासनाने मंजुरी दिल्याचे २६ जुलै २०२४ च्या राजपत्रात प्रसिद्ध केले आहे. खासगी क्षेत्राच्या संदर्भात भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क ‘अधिनियम २०१३’मधील तरतुदीनुसार नुकसान भरपाई दराची रक्कम उच्चतम दराने द्यावी व या क्षेत्रातील बहुतांश भूसंपादन हे संमतीने संपादित करण्यात यावे, असेही स्पष्टपणे नमूद केले आहे. भूसंपादनाच्या कार्यवाहीसाठी रत्नागिरी प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे; मात्र ही अधिसूचना जारी झाल्यापासून स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular