सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकांचे काल निकाल जाहीर झाल्याने, पक्षांनी घेतलेली मेहनत काही ठिकाणी दिसून आली आहे. तळकोकणात मंत्री केसरकर यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील आपला उमेदवार जिंकून यावा यासाठी अपार कष्ट घेतले आहेत.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघातील दोडामार्ग तालुक्यात २८ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्यातील १६ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकला असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि पक्ष प्रवक्ते म्हणून त्यांचे पक्षात विशेष स्थान आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात एवढे मोठे यश मिळत असेल तर त्याचे सारे श्रेय मंत्री केसरकर यांनाच जाते.
तालुक्यातील २८ पैकी १६ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यात तीन ग्रामपंचायती बिनविरोध, तर एक सरपंच बिनविरोध आहे. तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, हर्षद सावंत, योगेश महाले, रामदास मेस्त्री, शैलेश दळवी, बाबाजी देसाई, संजय गवस, प्रेमानंद देसाई, तिलकांचन गवस, गोपाळ गवस यांनी सोळा ग्रामपंचायतींवर विजय मिळाल्याचा दावा केला आहे.
झोळंबे, कोलझर, सासोली, झरेबांबर, पिकुळे, मांगेली, कोनाळ, घोटगेवाडी, तळेखोल, घोटगे, आंबडगाव, बोडदे-खानयाळे या आज निकाल जाहीर झालेल्या बारा, तर बिनविरोध झालेल्या केर, मोर्ले विर्डी या तीन आणि सरपंचपद बिनविरोध झालेली मणेरी ग्रामपंचायत अशा एकूण बारा ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेने दावा केला आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात सुरुवातीपासून चुरस पाहायला मिळाली.