लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघावर कोण वर्चस्व प्राप्त करतो, मतदार कोणाला तेथे कौल देतात, हे औत्सुक्याचे ठरणार आहे. यापूर्वी बॅरिस्टर अंतुले यांच्यासह शेतकरी कामगार आणि शिवसेनेच्या ताब्यात असणारे तेथील अनेक तालुके, गावे यांच्यावर गेल्या काही वर्षांमधील विविध राजकीय घडामोडींनंतर मतदारांवरही मोठा परिणाम झाला आहे. या मतदारसंघात अनेक समीकरणे वा गणिते बदलली गेली आहेत. आता या वेळच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे प्रभावी ठरतात की, आपली खासदारकी परत मिळवण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अनंत गीते यशस्वी ठरतात, याकडे रायगडच्या मतदारांचे लक्ष लागले आहे.
यंदाची ही रायगडची निवडणूक अलीकडच्या काही वर्षांमधील राजकीय उलथापालथींमुळे काय फलनिष्पत्ती देईल, ते आता पाहणे उत्कंठावर्धक ठरणार आहे. यानंतर २०१४ मध्ये संपूर्ण देशात मोदी लाट आली असताना स्वाभाविकपणे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी ३ लाख ९६ हजार १७८ मते मिळवत पुन्हा रायगडचे खासदार होताना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा (३ लाख ९४ हजार ६८ मते) पराभव करून विजयी मिळवला. या काळात गीतेंचा संदेश काय, अशी चर्चा जोर धरू लागली आणि शिवसेना भाजप युतीकाळामध्येही गीते आणि सुरेश प्रभू यांना मंत्रिपदे देत जवळ करून मोदी यांनी शिवसेनेला वेगळाच संदेश पाठवला होता.
यानंतर २०१९ मध्ये गीते यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना ४ लाख ८६ हजार ९६८ मते मिळवत विजय संपादन करता आला तर अनंत गीते यांना ४ लाख ५५ हजार ५३० मते मिळवूनही ३१ हजार ४३४ मतांनी पराभव पत्करावा लागला होता.