सतत होत असलेल्या वातावरणातील बदलांचा फटका आंबा हंगामाला बसणार आहे. गेल्या चार दिवसांत थंडी, ऊन आणि पाऊस असे वातावरण होते. हवेत हलका गारवा निर्माण झाला आणि धुकेही मोठ्या प्रमाणावर पडत आहे. त्यामुळे आंबा कलमांच्या मुळावर ताण येऊन आंबा मोहोर सुरू होईल, अशी शक्यता होती. परंतु, काल अचानक पावसाने दगा दिला आहे. त्यामुळे पालवी न फुटलेल्या झाडांनी पालवी येण्याची भीती बागायतदारांमध्ये आहे. तसे झाले, तर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आंबा बाजारात येण्याची शक्यता लांबली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण जास्त होते. तसेच पाऊस ऑक्टोबरच्या मध्यांतरापर्यंत लांबला परतीच्या पावसाबरोबर अवकाळी पावसानेही किनारपट्टी भागाचा पिच्छा सोडला नाही. ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यातही पावसाचा मुक्काम होता. त्यामुळे ऑक्टोबर सरत आली, तरी अपेक्षित थंडीची प्रतीक्षा बागायतदारांमध्ये आहे.
ऑक्टोबर महिन्यात उन्हाळा कडाका सर्वाधिक होता. आता दिवाळीच्या दिवसात हवेत गारठा सुरु झाला आहे. पण, हवी तशी थंडी पडत नाही. त्याचे प्रमाण कमी आहे. दिवाळीत पडणाऱ्या थंडीतच कलमे मोहरु लागतात. वातावरण कोरडे असल्याने कलमे मोहरण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. ऐरवी थंडी पडायला सुरवात झाली की, ग्रामीण भागात आंबा कलमांना मोहर फुटू लागतो. यंदा अद्याप थंडी पडलेली नाही. त्याउलट ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागत आहे. वातावरण बदलल्यास कलमांना मोहर येईल; मात्र त्यासाठी यंदा नोव्हेंबर महिन्याची प्रतीक्षा करवावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत थंडी वाढली, तर मोहर चांगला होऊन फेब्रुवारी मार्चमध्ये आंबा बाजारात येईल. मात्र, वातावरण प्रतिकूल राहिल्यास आंबा बाजारात दाखल होण्यास एप्रिल महिनाही उजाडेल, असा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे.