राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रत्यक्ष पहाणी करुन आढावा घेतला. यावेळी त्यांनी चौपदरीकरणातील दुसरी मार्गीका डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न करु असे स्पष्ट सांगितले. हे काम सोपे नाही, मात्र तरीही आमचे प्रयत्न त्यादृष्टीने असतील असे सांगायला देखील ना. चव्हाण विसरले नाहीत. ना. रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी मुंबई-गोवा महामार्गाची विशेषतः कशेडी बोगद्याची पाहणी केली. त्यांनी याआधीच्या पाहणी प्रसंगी दिलेल्या आश्वासनानुसार या बोगद्यातील एक मार्गिका सुरू झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात मुंबईहून येणारे चाकरमनी या मार्गिकेचा वापर करू शकतील.
या कामाची मंत्री चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. महामार्गावरील पुलांचे काम अजून बाकी आहे. जे काम अर्धवट झाले आहे त्याचे ऑडिट करणे, ते योग्य आहे की नाही तपासणे आणि त्यानंतर उर्वरित काम करणे ही बाब सोपी नाही. मात्र सकारात्मक पद्धतीने विचार करून डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मंत्री चव्हाण यांनी यावेळी बोगद्यातून रवाना होणाऱ्या वाहन चालकांना हात दाखवून शुभेच्छाही दिल्या.