ग्रामीण एसटी वाहतुकीप्रमाणे शहरी वाहतुकीच्या गाड्यांमध्येही महिलांना सवलत देण्याची महिलांची मागणी आहे. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करू, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत येत्या २० तारखेला मुंबईत बैठक बोलावू व निर्णय घेऊ, असेही आश्वासित केले. महाराष्ट्र राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली होती. एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. १७ मार्चपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना तिकीट दरात ५०. टक्के सवलत लागू करण्यात आली आहे; परंतु शहरी वाहतुकीमध्ये ही सवलत लागू नाही.
सवलतीमुळे रत्नागिरीत ग्रामीण गाड्यांना गर्दी होते व शहरी गाड्यांत बसायला प्रवासी तयार होत नाहीत. या संदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असे मंत्री म्हणाले, या प्रश्नावर तत्काळ सामंत यांनी महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांना फोन केला आणि माहिती जाणून घेतली. त्यानंतर हा प्रश्न सोडवू, अशी ग्वाही दिली. रत्नागिरी, लांजा, राजापूरमधील एसटी कर्मचाऱ्यांनी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत या वेळी चर्चा केली. सामंत यांनी सर्व समस्या समजून घेऊन शासनाला जेवढ्या योजना मार्गी लावता येतील त्या सर्वासाठी तुमचा पालकमंत्री म्हणून पाठपुरावा करणार असल्याचा शब्द सामंत यांनी दिला.
गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळात कामगार वेतन करार झालेला नाही. त्यामुळे वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. महाराष्ट्रातील एसटी कामगारांच्या अनेक समस्या प्रलंबित असून त्यांना न्याय मिळण्यासाठी कामगारांनी सामंत यांना निवेदन दिले. निवेदनामधील आवश्यक मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मार्गी लावणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. या वेळी मंगेश देसाई, समीर हर्डीकर, गुरूनाथ सुर्वे, साईप्रसाद जुवेकर, मंगेश खानविलकर आदीसह शंभरहून अधिक कर्मचारी उपस्थित होते.
महिलांची गर्दी होणार – रत्नागिरीमध्ये शहरी एसटी वाहतूक सुरू आहे; पण त्यात महिलांना सवलत दिली जात नाही. ग्रामीण गाड्यांचे तिकीट महिलांना अर्धे असल्यामुळे आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत असल्याने सर्व प्रवासी ग्रामीण गाड्यांमध्ये प्रवास करणे पसंत करतात. परिणामी, रत्नागिरीतील शहरी बससेवेत कमी भारमान दिसत आहे. त्यामुळे ती तोट्यात चालवली जात आहे. शहरी वाहतुकीच्या गाड्यांमध्ये महिलांना प्रवासात सवलत दिल्यास या गाड्यांमध्येही महिलांची गर्दी होणार आहे.