खेड नगरपरिषदेवर महायुतीची एकहाती सत्ता स्थापन झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सोमवारी सकाळी खेड शहरात दाखल झाले. नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवी बुटाला आणि सर्व विजयी नगरसेवकांचे, अभिनंदन करण्यासाठी ते’ आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खेडमध्ये महायुतीला मिळालेला विजय हा ऐतिहासिक विजय असून हा गड मी नव्हे एकनाथ शिंदेंनी जिंकला असे त्यांनी स्पष्ट सांगितले. यावेळी बोलताना ना. उदय सामंत म्हणाले की, हा विजय माझा नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, साहेबांचा आहे. राज्यमंत्री योगेश कदम, आमचे उपनेते संजय कदम, सदानंद चव्हाण, राजन साळवी, किरण भैया सामंत आणि संपूर्ण टीमने एकत्रितपणे काम केल्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यांत ९९ टक्के स्ट्राईक रेट राखता आला. शिवसेना-भाजपला खेडवासीयांनी भरभरून दिलेले मत हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. खेड नगरपरिषदेबाबत आश्वासन देताना ते म्हणाले, पालकमंत्री म्हणून मी पहिल्यांदा इथे आलो आहे.
खेड नगरपरिषदेला एकही रुपया कमी पडू देणार नाही, असे मी खेडवासीयांना आश्वस्त करतो. शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातील टिपणीबाबत बोलताना ना. सामंत म्हणाले की, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. फारसे मनावरही घेत नाही आणि जनतेनेही घेऊ नये. जर ईव्हीएमवर एवढे आक्षेप असतील, तर सर्वप्रथम केंद्रात राहुल गांधींनी राजीनामा दिला पाहिजे, कारण तेही ईव्हीएमवरूनच निवडून आले आहेत. तसेच उबाठा गटाचे आमदार खासदारही ईव्हीएमवरून निवडून आलेले आहेत. ही दुटप्पी भूमिका असून हा राजकीय बालिशपणा आहे आणि महाराष्ट्र तो मनावर घेत नाही. आगामी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली २९ पैकी २९ महानगरपालिकांवर महायुतीचा भगवा फडकणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आमदार शेखर निकम यांच्या ‘स्वबळा’च्या नाऱ्यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले की, ही राष्ट्रवादीची भूमिका असू शकते, मात्र शिवसेना आणि भाजप या जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक एकत्रितपणे लढणार आहेत. असा प्रकल्प होवू देणार नाही कोकणातील उद्योगांबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चावर बोलताना उद्योगमंत्री ना. उदय सामंत म्हणाले, कोकणच्या निसर्गाला किंवा येथील नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणारा कोणताही प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. एखादी कंपनी लोटे परशुराम किंवा कोकणातील कुठल्याही भागात घातक उत्पादन करणार असेल तर ती आम्ही थांबवू, तो होवू देणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

