मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने नाराज झालेल्या एकनाथ शिंदेंनी भाजपसमोर तीन प्रस्ताव ठेवले असल्याचे राजकीय वर्तुळातील सुत्रांकडून समजते. त्यातील शेवटचा प्रस्ताव भाजपची झोप उडविणारा असून आपल्या मागण्या मान्य न झाल्यास एकनाथ शिंदे यांनी सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत शिंदे सरकारच्या बाहेर असणे भाजपला परवडणारे नसून त्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान हे प्रस्ताव म्हणजे शिंदेंचे दबावतंत्र असून हवे ते पदरात पाडून घेण्यासाठी आखलेली रणनिती असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या महायुतीला अद्याप सत्ता स्थापन करता आलेली नाही. निकाल लागून १० दिवस उलटले तरीही महायुतीनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. सोमवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सगळ्या बैठका रद्द केल्या आहेत.
ते ठाण्यातील घरी आराम करत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी दोन दिवस मौन बाळगलं. त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेत सत्ता स्थापण्याचे सर्वाधिक भाजप नेतृत्त्वाला दिले. मग दिल्लीवारी करुन परतताच शिंदे थेट गावाला गेले. तिकडे मुक्काम करुन रविवारी ते ठाणे येथे परतले. त्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येईल असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र सोमवारी आजारपणाचे कारण देत शिंदेंनी सगळ्या गाठीभेटी रद्द केल्या आहेत. त्यामुळे शिंदेंचं नेमकं चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिंदे नेमकं काय करणार? – शिंदेंनी ३ पर्याय ठेवले आहेत. त्यातील कोणता पर्यायं स्वीकारायचा हे भाजपला ठरवायचे आहे. आता प्रस्तावाबाबत भाजप काय निर्णय घेते यावर बरेच काही अवलंबून आहे.
प्रस्ताव पहिला – उपमुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती भाजपकडे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे, अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद अशी रचना पुढील सरकारमध्ये असू शकते. भाजपकडून शिंदेंना तशीच ऑफर आहे. उपमुख्यमंत्रिपद मिळणार असेल तर मग गृह मंत्रालय मिळावं, अशी शिंदेंची मागणी आहे. गृह विभाग महत्त्वाचा असल्यानं या मंत्रालयासह उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास शिंदेंना अडचण नसेल. फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह विभाग होता. त्याच प्रकारे शिंदेंना गृह मंत्रालय मिळावं, असा शिवसेनेचा युक्तिवाद आहे.
प्रस्ताव दुसरा – स्वतःच्या जागी अन्य नेत्याकडे उपमुख्यमंत्रिपद भाजपनं गृह मंत्रालय सोडण्यास नकार दिल्यास शिंदे सरकारबाहेर राहून स्वतःच्या जागी अन्य नेत्याकडे उपमुख्यमंत्रिपद देऊ शकतात. शिंदेंचे पुत्र श्रीकांत यांच्या नावाची चर्चा या पदासाठी सुरु होती. खुद्द एकनाथ शिंदेंनी साधकबाधक चर्चा सुरु असल्याचं विधान केलं होतं. पण श्रीकांत शिंदेंनी आपल्याला कोणत्याही पदाची लालसा नसल्याचं म्हणत उपमुख्यमंत्रिपदाच्या बातम्या तथ्यहीन असल्याचं म्हटलं. सेनेकडून दीपक केसरकर याचं नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. याशिवाय उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांची नावंही चर्चेत आहेत.