गतवर्षी प्रारंभीच्या काळात झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर सुरू झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच आठवडयात तालुक्यात महावितरणच्या विजेसेवेचा पुरता बोजवारा उडाला होता. अनेक भागात चार ते पाच दिवस विजपुरवठा खंडीत झालेला होता. मात्र गतवर्षीच्या या अनुभवातुन धडा घेऊन यावर्षी तरी पावसाळ्यात राजापूरकरांना अखंडीत असा विजपुरवठा महावितरण कडुन होईल अशी राजापूरकरांची अपेक्षा होती. मात्र तालुक्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात विजपुरवठा खंडीत झाल्याने महावितरण विषयी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ऐन लग्सराईच्या हंगामात विजपुरवठा खंडीत होत असल्याने वऱ्हाडी मंडळींसह व्यापारीही पुरते त्रस्त झाले आहेत.
मान्सून अद्याप सुरू व्हायचा आहे, आणि कोसळलेल्या अवकाळी पावसातच महावितरणची बत्ती अनेक भागात गुल झाल्याने आता पावसाळयात काय होणार? असा प्रश्न राजापूरकरांना पडला आहे. गेले आठ महिने दर सोमवारी देखभाल दुरूस्तीसाठी बंद केल्या जाणाऱ्या विजपुरवठ्यांतून महावितरणने नेमकी काय देखभाल दुरूस्ती केली असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. गतवर्षी प्रारंभी अवकाळी पावसात व त्यानंतर विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह आगमन झालेल्या मान्सूनने तालुक्यात चांगलीच दाणदाण उडवीली होती. तालुक्यात अनेक भागात जणू विज आणीबाणी असल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र भर पावसातही रात्रंदिवस काम करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विजपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.
मात्र गतवर्षी अवकाळी व त्यानंतर मान्सूनच्या सुरूवातीला आलेल्या कटु अनुभवातून महावितरणने काहीतरी शिकण्याची गरज असतानाही तसे झालेले दिसत नाही. कारण गेले दोन दिवस पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठीकाणी विजपुरवठा खंडीत झाला आहे. शहरात तर सारखी सारखी विज जात आहे. त्यामुळे ग्राहक पुरते त्रस्त झाले आहेत. जर आत्ता ही अवस्था तर मग पावसाळयात काय होणार असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे. मान्सून सक्रीय होण्यास अद्यापही १५ ते २० दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे या कालावधीत तरी महावितरणने शहरासह ग्रामीण भागातील विजपुरवठ्याची कामे पुर्णत्वाला न्यावीत आणि पावसात अखंडीत विजपुरवठा करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत. तर प्रशासनाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या नैसर्गिक आपत्ती निवावरण बैठकांमध्ये महावितरणच्या प्रश्नांबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे व याबाबत तशा सुचना महावितरणला द्याव्यात अशी मागणी होत आहे.