गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर परप्रांतीय कामगारांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्या विरोधात कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही. गणपतीपुळे येथील चार तरुणांनी प्रजासत्ताक दिनी (ता. २६ जानेवारी) उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. गणपतीपुळे किनाऱ्यावर असलेल्या लहानमोठ्या व्यवसायांमध्ये परप्रांतीय व्यावसायिकांचा समावेश अधिक आहे. याबाबत गणपतीपुळे येथील काही जागरूक तरूणांनी या अतिक्रमणाबाबत आवाज उठवला आहे. गणपतीपुळे ग्रामपंचायतीला वेळोवेळी माहितीही दिली आहे. तसेच गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतही याबाबत आवाज उठविण्यात आला आहे.
परंतु दोन महिने उलटले तरीही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून हाती घेतली गेलेली नाही. त्यामुळे गणपतीपुळेतील तरुणांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. किनाऱ्यावरील परप्रांतीयांच्या अतिक्रमणाबाबत गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून काही महिन्यांपूर्वी नोटीस लावण्यात आली होती. त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे गणपतीपुळे येथील स्थानिक ग्रामस्थ मंगेश मनोहर गोताड, विश्वनाथ विनायक पालकर, समीर यशवंत कदम व संकेत शशिकांत गावणकर आदींनी २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा बसण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळेल आणि लवकरात लवकर सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.