मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात ८५ वर्षीय महिलेसह चालक गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताविषयी खेड पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्यांच्या दिशेने जात असलेली स्विफ्ट कार भरधाव वेगात भरणे नाका परिसरातील जाधववाडी येथे आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात कोसळले. अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर कारच्या चाकांचे व्रण दिसून येत होते, तर महामार्गालगत असणाऱ्या गावाच्या नावाच्या फलकाला धडक देऊन थेट खड्ड्यात जाऊन कार कोसळली.
या कारमध्ये प्रवास करणाऱ्या जुबेदा शहा (वय ८५, कल्याण) आणि चालक अरबाज (वय २७) दोघही गंभीर जखमी झाले आहेत. ही दोघेही स्विफ्ट कारमधून कणकवलीच्या दिशेने जात होते. अपघातानंतर तत्काळ स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून भरणे नाका परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. वाहतुक पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देत अधिक तपास सुरू केला आहे.

