रत्नागिरी शहराजवळील टीआरपी आदिनाथ नगर रस्त्यावर डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात महावितरणच्या २ कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू ओढवला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. डंपर चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मिऱ्या-नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे हा भिषण अपघात झाला असल्याची चर्चा सर्वत्र आहे. राघो कृष्णा धुरी (६८, रा साईनगर रत्नागिरी), मुक्तेश्वर सहदेव ठीक (५८, रा प्रशांतनगर, रत्नागिरी) अशी अपघातात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांची नावे असल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. हा अपघात शुक्रवारी (ता. २५) सकाळी ८.३०वा. सुमारास टिआरपी-आदिनाथ नगर समोरील रस्त्यावर झाला. मिळालेल्या माहितीनुसार राघो धुरी हे महावितरणचे निवृत्त अधिकारी होते. तर मुक्तेशवर ठिक हे महावितरण येथे कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी धुरी हे दुचाकीवरून सोबत मुक्तेश्वर ठिक यांना घेऊन मारुती मंदिर मार्गे नाचणेरोड वरील त्यांच्या महावितरण कार्यालयाकडे येत होते.
टीआरपी येथे आले असता समोरुन येणाऱ्या एसटीला त्यांनी बाजू दिली. मात्र रस्त्याच्या कामामुळे खडीवरुन दुचाकीवरील ताबा सुटून दोघे खाली पडले. दुचाकी रस्त्याच्या एका बाजूला पडली व दोघेही वृद्ध रस्त्यावर आडवे पडले. त्याचवेळी रस्त्यावर हातखंबाहून येणाऱ्या डंपर चालक नागेश शंकर कट्टेमणी (वय ३२, रा. स्टेट बॅक कॉलनी, मजगाव रोड, रत्नागिरी) हे डंपरने वेगाने येत होते. त्यांचा डंपरवरील ताबा सुटला आणि डंपर त्या दोघांच्याही डोक्यावरुन गेला. दोघांचाही जागीच मृत्यू झाला असे पोलीसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोघांच्याही नातेवाईकांना माहिती दिली.
नातेवाईक आल्यानंतर रुग्णालयात गर्दी झाली होती. मिऱ्या नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे हा अपघात झाला असल्याची चर्चा रुग्णालयात रंगली होती. या प्रकरणी नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित डंपर चालकावरुिद भादवी कलम १०६ (अ), १२५ (अ) (ब), २१९ व मोटार वाहन कायदा १८४ अन्वेय गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे अमलदार करत आहेत.
डंपर काळ बनून आला – शुक्रवारी सकाळी दोघे मित्र दुचाकीवरून महावितरण कार्यालयाकडे निघाले होते. टीआरपी येथे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने खोदाई सुरू आहे. रस्त्यावर माती आणि खडी मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. या ठिकाणी आल्यानंतर खडीवरून दुचाकी घसरली आणि मागून येणारा डंपर या दोघांसाठी काळ बनून आला.