सावंतवाडी येथील मोती तलावा मधील गाळ काढताना तलावाची संरक्षक भिंत कमकुवत झाली होती आणि ती पावसाळ्यामध्ये कोसळली, त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सतावत होता. लोकप्रतिनिधी,पत्रकार यांनी वारंवार याकडे लक्ष देऊन संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारण्यात आला होता मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने गेले कित्येक महिने सावंतवाडी येथील मोती तलावाच्या त्या संरक्षक भिंतीचा प्रश्न पुनर्बांधणीसाठी अनेक महिन्यांपासून रखडत पडला होता, याबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आक्रमक पवित्रा घेत १७ डिसेंबर पासून सह्यांची मोहीम राबवून आंदोलन करण्याचे घोषित केले होते.
परंतु आज बांधकाम अधिकारी चव्हाण यांनी आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच २२ डिसेंबरला वर्क ऑर्डर देण्यार आहे, तसेच ठेकेदाराने तात्काळ काम सुरू करण्याचे मान्य केल्याचे फोनवरून सांगितले आहे. त्यामुळे अखेर मोती तलावाच्या कामाचे रखडलेले काम होण्यासाठी केलेल्या आंदोलनाला न्याय मिळाला आहे. स्थानिकांमध्ये देखील यामुळे समाधानाचे वातावरण पसरले आहे.
माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, रवी जाधव, नगरसेविका अफरोज राजगुरू, राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर, उपाध्यक्ष बंड्या तोडफेकर, दिलीप पवार, संतोष तळवणेकर, कल्याण कदम यांच्याशी चर्चा करून तूर्तास उद्या होणारे आंदोलन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकातून दिली आहे. आंदोलनापूर्वीच बांधकामाचे आश्वासन मिळाल्याने इतिहासकालीन प्रसिद्ध मोती तलावाचे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे.