मंडणगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बॉक्साईटच्या वाहतुकीचे काम सुरु आहे. पण हि वाहतूक हि स्थानिक घरांच्या आणि वाडयांच्या मधून होत असल्याने आणि वाहन चालक बेशिस्तपणे वाहतूक करत असल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याप्रमाणेच या सततच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण, रस्त्यांची दुरवस्था यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.
वाहतुकीसाठी वाहने आणि चालक हे परराज्यातील असून, स्थानिकांना मात्र उपेक्षित ठेवण्यात येत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने कंपनीकडे बोलणे सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून दापोली व मंडणगड तालुक्यातून बॉक्साईट वाहतूक सुरू असताना व्यवस्थापनाने स्थानिक वाहतूक व्यावसायिकांना या प्रक्रियेत समाविष्ट न केल्याने स्थानिक डंपरचालकांचे दापोली-मंडणगड स्वयंरोजगार सहकारी वाहतूक संस्थेच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांची भेट घेत स्थानिक वाहतुक व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता निवेदन सादर केले आहे.
आशापुरा मायनिंग कंपनीच्या बॉक्साईट वाहतुकीचे काम मौजे रोवले, उंबरशेत येथे सुरू आहे. ही वाहतूक वेस्टर्न इंडिया मायनिंग ऍण्ड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून सुरू आहे. रोवले ते मांदिवली, केळशीफाटा, देव्हारे, मंडणगड, कुंबळे, लाटवणमार्गे महाड करंजाणी अशा मार्गाने सुरू असलेली वाहतूक कंपनीने कुठल्याही मध्यस्थाशिवाय स्थानिक डंपर मालकांना थेट वर्क ऑर्डर देवून चालवावी. त्यांना प्रक्रियेत समाविष्ट करून पेमेंट द्यावे. स्थानिक रोजगार देण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.