31.6 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriसंगमेश्वर बाजारपेठेत अग्नितांडव ! दोन दुकाने खाक

संगमेश्वर बाजारपेठेत अग्नितांडव ! दोन दुकाने खाक

शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बाजारपेठेत शनिवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन दुकाने खाक झाली. आगीत दुकानांचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. येथील बाजारपेठेतील शक्ती ट्रेडर्स या हार्डवेअर दुकानाला पहाटेच्या सुमारास प्रथम आग लागली. याच दुकानाच्या बाजूला असलेल्या प्रशांत बेंडके यांच्या किराणा मालाच्या दुकानालाही आगीने वेढले. बघता बघता दोन्ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीमुळे धुराचे साम्राज्य पसरले होते. दुकानांना आग लागल्याचे कळताच व्यापाऱ्यांनी तिकडे धाव घेतली.

आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न ग्रामस्थांच्या वतीने सुरू करण्यात आले; मात्र तोपर्यंत दोन्ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली होती. किराणा मालाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तसेच शक्ती ट्रेडर्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पहाटेच्या सुमारास लागलेली आग जवळपास दोन तासांहून अधिक काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. आग तेथे असलेल्या बंद दवाखान्यापर्यंत पोहोचल्याने दवाखान्यालाही या आगीचा फटका बसला.

संगमेश्वरमध्ये अग्निशमन बंब नसल्याने देवरूख नगरपंचायत, चिपळूण नगरपालिका, रत्नागिरी एमआयडीसी यांचे अग्निशमन बंब मागवण्यात आले. प्रशांत बेंडके, भावेश कांतिलाल पटेल, कांतिलाल देवजी पटेल यांच्या दुकानातील सर्व माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने या व्यापाऱ्यांचे एकूण २ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशांत बेंडके यांच्या बाजूला असणाऱ्या कुलभूषण सुनील सुर्वे यांच्या दुकानालाही आगीची झळ बसली आहे.

संगमेश्वर बाजारपेठेत दोन दुकानांना आग लागल्याचे वृत्त समजताच चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून शक्ती ट्रेडर्सचे मालक कांतिलाल आणि भावेश पटेल, तसेच प्रशांत बेंडके यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. दरम्यान, माभळेचे तलाठी संदेश घाग, मंडल अधिकारी अमर चाळके, वांद्रीचे तलाठी अशोक जाधव, कोतवाल अमर जाधव, गौताडचे तलाठी अप्पा आठले, सुधीर यादव, आदींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. यामध्ये अंदाजे दोन कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular