तालुक्यातील दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवणक्षेत्रातील गावातील ग्रामस्थांना महसूल प्रशासनाकडून स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तालुक्यातील १८० कुटुंबांना सतर्कतेच्या आणि स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत; मात्र इंदवटी बाईतवाडी येथील दोन कुटुंबांची तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी भेट घेऊन व लोकांची मनधरणी केल्यानंतरही राहती जागा सोडण्यास व स्थलांतरास त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
इंदवटी बाईतवाडी येथील २० घरांचे व २५ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे; मात्र इंदवटी बाईतवाडी येथील दोन कुटुंबीयांनी स्थलांतरास नकार दिला आहे. महसूल प्रशासनाकडून तहसीलदार प्रमोद कदम आणि प्रांताधिकारी वैशाली माने यांनी या ग्रामस्थांची भेट घेतली. बाईतवाडी या ठिकाणी वरच्या भागात मोठा दगड असून, खालील बाजूला दोन घरे आहेत. अशा परिस्थितीत भूस्खलन झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.
तसेच तुम्ही जागा सांगा, आम्ही त्या जागेवर तुमचे पुनर्वसन करतो, असे देखील तेथील ग्रामस्थांना सांगितले आहे; मात्र आमची ही पूर्वापार जागा आहे. आमची देवाची जागा आहे आणि ही जागा सोडणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरडग्रस्त व भूस्खलन भागातील कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासन पुढाकार व प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनीच राहती जागा सोडून जाण्यास नकार दिला आहे.