महिन्याभरानंतर मासळीचे दर खवय्यांच्या आवाक्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणांच्या मासळी मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. मिरकरवाडा बंदरावर बांगडा १०० रुपये किलो, तर सुरमई ४०० ते ६०० रुपये किलो दराने विकली जात आहे. गेल्या काही दिवसांत खोल समुद्रात मासळी समाधानकारक मिळत असल्यामुळे त्याचा फायदा ट्रॉलिंग, पर्ससीननेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांना होत आहे. दिवाळीपूर्वी कोकण किनारपट्टीवरील वातावरण बिघडल्यामुळे मासेमारी व्यवसायावर संक्रांत होती. काहीवेळा मच्छीमारांना नौका बंदरावरच उभ्या करून ठेवाव्या लागत होत्या; परंतु मागील आठवड्यात चित्र बदलले आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारी नौकांना समाधानकारक मासळी मिळत आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढल्यामुळे मासळीचे दरही सर्वसामान्य ग्राहकाला परवडण्यासारखे झाले आहेत. महिन्याभरापूर्वी मासळीचा रिपोर्ट कमी असल्यामुळे दर वधारले होते. ९०० रुपये किलो दराने मिळणारी लहान आकाराची सुरमई रविवारी ४०० रुपये तर मोठ्या आकाराची ६०० रुपये किलो दराने मिरकरवाडा जेटीवर उपलब्ध होती.
महिन्याभरापूर्वी बांगड्याचा किलोचा दर २०० रुपये होता, तो १०० रुपयांवर आला आहे. सर्वसाधारण १२० पर्यंत स्थिर राहील, असा अंदाज आहे. सरंगा ६०० रुपये किलो दराने मिळत होता. महिन्याभरापूर्वी हाच दर अधिक होता. सौंदाळ्याचा दर मात्र महिन्याभरापूर्वीप्रमाणेच ३०० रुपये किलो इतकाच आहे. कोळंबीचा दरही प्रतवारीप्रमाणे ८० ते ३०० रुपये किलो आहे. रत्नागिरीतील विविध मासळी मार्केटमध्ये मिळणारी मासळी मिरकरवाडा बंदरावरूनच आणून विकली जाते. त्यामुळे बंदरावर असणाऱ्या मासळीच्या दरानुसार विविध मासळी मार्केटमधील दर अवलंबून असतात. रविवारी हे दर खवय्यांना परवडणारे होते. त्यामुळे बाजारपेठेतील मच्छीमार्केटसह राजीवडा, मिरकरवाडा येथील मासळी मार्केटमध्ये खवय्यांची गर्दी होती.
गिलनेट नौकांना मासळीची प्रतीक्षा – खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना समाधानकारक मासे मिळत असले तरीही गिलनेटद्वारे किनाऱ्यापासून ५ ते १० वावांत मासेमारी करणाऱ्यांना मासे मिळत नाहीत. १०० पैकी ५ बोटींना मासे मिळत असल्याचे मच्छीमार अभय लाकडे यांनी सांगितले. ते म्हणाले, मासेमारीचा खर्च २५ हजार रुपयांपर्यंत येतो. मागील दीड महिन्यात समाधानकारक मासळी मिळत नाही, त्याचा फटका बसत आहे.