यकृत हे मानवी शरीराचे अत्यंत महत्वाचे अंग आहे. हे पोट आणि आतड्यांमधून बाहेर पडणारे रक्त स्वच्छ करते आणि नंतर या रक्तातील पोषक घटकांचे विघटन, नियमन आणि उत्पादन करते. निरोगी यकृताचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि त्या बाबतीत सर्वांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १९ एप्रिलला यकृत दिन साजरा केला जातो. म्हणूनच, वेळोवेळी आपल्या लिव्हरची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी स्वतःच आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली जपणे आवश्यक आहे.
निरोगी आरोग्यासाठी जसे सकस आहार तसेच योग्य आणि पुरेसा व्यायाम देखील गरजेचा आहे. व्यायाम करणे हे केवळ निरोगी यकृत राखण्यासाठीच नाही तर आपल्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि फायदेशीर ठरणार आहे. व्यायामामुळे यकृतावरील ताण कमी होतो, उत्पादकता वाढते आणि लठ्ठपणा टाळण्यास मदत होते.
व्यायामाच्या सोबतीने योग्य आहार देखील घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगले आरोग्य राखण्यासाठी आपल्याला पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण सकस आहार घेतो तेव्हा यकृताच्या आरोग्यास देखील योग्य रित्या चालना मिळते. शरीराला ७ वेगवेगळ्या प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते, त्यामुळे शरीराची दररोजची गरज लक्षात घेऊन या सर्वांचे दररोज सेवन केले पाहिजे.
अति प्रमाणात अल्कोहोल सेवन केल्याने यकृताच्या र्हासास मोठ्या प्रमाणात हातभार लावतात. जेव्हा आपले यकृत अल्कोहोलवर प्रक्रिया करते, तेव्हा अनेक यकृत पेशी मरतात. आपले यकृत नवीन पेशींचे पुनरुत्पादन करू शकते. परंतु, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच त्यामुळे जास्त मद्यपान केल्यामुळे आपल्या यकृताला नुकसान होऊ शकते. त्यामुळे अल्कोहोलचे सेवन शक्यतो टाळावेच.