मुरडव- आरवली (ता. संगमेश्वर) येथील जंगलामध्ये प्राण्यांची शिकार करण्यासाठी जाणाऱ्या तिघांच्या स्थानिक गुन्हे शाखा व संगमेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. संगमेश्वर पोलिस ठाण्यात संशयित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून बंदूक, जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. विश्वास विष्णू हेमंत (वय २९, रा. माखजन, संगमेश्वर, जि. रत्नागिरी), रवींद्र आत्माराम गुरव (३५, रा. धामापूरतर्फे संगमेश्वर, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) आणि अभिजित गोविंद मांडवकर (४५, रा. आंबव पोंक्षे, ता. संगमेश्वर) आणि सुदेश हनुमंत मोहिते (३३) अशी संशयितांची नावे आहेत. हा प्रकार शुक्रवारी (ता. १३) आरवली येथील जंगलात निदर्शनास आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून काहीजण संगमेश्वर येथील जंगलामध्ये प्राण्यांची शिकार करत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक संगमेश्वर येथील मौजे मुरडव-आरवली येथे गस्त घालत असताना एका दुचाकीवरून तिघेजण आरवलीच्या दिशेने जाताना दिसले. या दुचाकीवर बसलेल्या एकाच्या कपाळावर एक चार्जिंग बॅटरी एकाच्या पाठीवर एक बंदूक असल्याचे व पाठीमागे बसलेल्या निदर्शनास आले. या पथकाने तिघांनाही थांबवले. ते तिघे संगमेश्वर येथील जंगलामध्ये शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याची खात्री पटली. त्यामुळे त्यांची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली.
त्यांच्याकडून एक सिंगल बॅरल काडतुस बंदूक, ६ जिवंत काडतुस, १ मोबाईल फोन, १ हेड चार्जिंग बॅटरी, १ एलईडी चार्जिंग बॅटरी, २ डब्यात गन पावडर व लहान मोठ्या आकाराचे शिस्याचे बॉल, १ मल्टीपर्पज स्टिलचा चाकू असे ८३ हजार २६० रुपयांचे शिकारीचे साहित्य जप्त करून संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेश गावित करत आहेत. संगमेश्वर पोलिस ठाणे व पथकाद्वारे तपास सुरू असताना शुक्रवारी आणखी एक संशयित सुदेश मोहिते याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १० हजाराची एक गावठी बनावटीची सिंगल बॅरल ठासणीची बंदूक जप्त करण्यात आली.

