24.9 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriदेवरूखमधील सुवर्ण व्यावसायिकाला लुबाडणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या

देवरूखमधील सुवर्ण व्यावसायिकाला लुबाडणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या

६,७५,००० रू. चा मुद्देमाल रत्नागिरी पोलीसांनी जप्त केला आहे.

साखरप्याहून देवरूखकडे निघालेले सुवर्ण व्यावसायिक धनंजय गोपाळ केतकर यांची गाडी अडवत त्यांचे अपहरण करून सोन्याचा ऐवज लुबाडणाऱ्या आणि खंडणीची मागणी करणाऱ्या ४ संशयित आरोपींना रत्नागिरी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ६,७५,००० रू. चा मुद्देमाल रत्नागिरी पोलीसांनी जप्त केला आहे. आरोपी आंतरराज्य टोळीशी संलग्न आहेत. दि. १७ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० ते १०.४५ वा. च्या दरम्यान साखरपा-देवरूख रोडवर वांझोळे येथे ही घटना घडली होती. देवरूखमधील सुवर्ण व्यावसायिक धनंजय गोपाळ केतकर (वय ६३) हे त्यांच्या बीएम डब्ल्यू कारमधून घरी परतत होते. त्याचवेळी एका पांढऱ्या रंगाच्या इटिंगा कारने केतकर यांच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर इटिंगामधून प्रवास करणाऱ्या जवळपास १० जणांनी अपघात झाल्याबद्दल नुकसानभरपाईची मागणी केली. हा वाद सुरू असतानाच त्यातील एकाने केतकर यांना गाडीच्या बाहेर खेचले. त्यांच्या अंगावर बुरखा टाकत जबरदस्तीने आपल्या गाडीत कोंबले आणि सुसाट निघाले.

खंडणीची मागणी – वांझोळे येथून राजापुरातील वाटूळच्या दिशेने गाडी धावत होती. अपहरणकर्त्यांनी केतकर यांना धम कावले, मारहाणही केली, तसेच त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या ३ साखळ्या आणि बॅगेत असलेली २० हजार रूपयांची रक्कम असा एकूण १६ लाखांचा ऐवज लुटला. त्याचप्रमाणे ५ लाख रूपयांची खंडणी मागितली.

ठार मारण्याची धमकी – ५ लाख रूपयांची खंडणी न दिल्यास आरोपींनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. डोक्यात दगडासारखी कठीण वस्तू मारून दरीत फेकून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी खंडणीच्या रक्कमेबाबत केतकर यांना घरी फोन करण्यासही सांगितले. मार्लेश्वर फाटा येथे येऊन पैसे द्या, असा मेसेज देण्यात आला.

वाटूळजवळ सोडले – मात्र त्यानंतर रात्री १२.३० वा. च्या सुमारास या लुटारूंनी वाटूळजवळ केतकर यांना सोडून दिले आणि स्वतः पोबारा केला. दरम्यान तोपर्यंत धनंजय केतकर घरी न. पोहोचल्याने त्यांचे कुटुंबिय आणि मित्र त्यांचा शोध घेत होते. ५ लाखांच्या मागणीबाबत केतकर यांनी भ्रमणध्वनीवरून कल्पना देताच त्यांचे मित्र बापू शेट्ये आणि अन्य मंडळींनी प्रसंगावधान दाखवत देवरूख पोलीसांशी संपर्क साधला. दरम्यान केतकर यांना वाटूळमध्येच राजापूर पोलीसांची गस्त घालणारी गाडी दिसली. त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पहाटे उशीरा केतकर त्यांच्या देवरूख येथील घरी पोहोचले. त्यांना लुटारूंनी मारहाण केल्यामुळे बोलतादेखील येत नव्हते.

पोलीसांचा तपास सुरु – केतकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपींचा शोध सुरू केला होता. केतकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात १० व्यक्तींविरूध्द देवरूख पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहितेचे कलम ३०९ (४), ३१० (१), ३११ यांसह अन्य काही कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसून शोध – या प्रकरणाचा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. पोलीसांची विविध पथके तयार करण्यात आली होती. अप्पर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी यांनी देखील पोलीसांना तपासाबाबत मार्गदर्शन केले होते.

मुसक्या आवळल्या – पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी समांतर तपास सुरू केला. पोलीस हवालदार विजय आंबेकर यांनी गोळा केलेल्या तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस ठाण्यांच्या दिशेने रवाना झाले. महामार्गावर पळस्पे फाटा येथे प्रणित संजय दुधाणे (वय ३०, रा. भडकंबा पेठवाडी, साखरपा) आणि चालक राजेंद्र अनंत नवाले (वय ३५, रा. संगमेश्वर) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. यापैकी प्रणित दुधाणे याने या परिसराची रेकी करून अन्य सहकाऱ्यांना माहिती दिली होती. पोलीसांनी बदलापूर येथे जाऊन दिपक राजेश लोहिरे (वय ३७) व विशाल मनोहर आचार्य (वय ४५) (दोघेही राहणार बदलापूर पूर्व) या दोघांना पकडले. हे दोन्ही दाखलेबाज गुन्हेगार असून त्यांची मोठी गँग असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले. याच प्रकरणात आणखी चार ते पाच जणांना पकडण्यात येणार आहे, असे पोलीसांनी सांगितले. त्यांच्याकडून एकूण ६,७५,००० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यामध्ये मोबाईल फोन हॅन्डसेट, स्कॉर्पिओ गाडी आणि १ लाख २० हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने उपविभागीय अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी यशस्वी केली. अधिक तपास देवरूख पोलीस स्थानकाचे निरीक्षक उदय झावरे करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular