मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाने संगमेश्वरच्या दुतर्फा सध्या वेग घेतला आहे. संगमेश्वर येथील सोनवी पुलाची कामे मंद गतीने सुरू असली तरीही रस्त्याचे काम थांबलेले नाही. सध्या आरवली ते संगमेश्वरदरम्यान वेगाने काम सुरू असताना तळेकांटे आणि कोळंबेनजीक बावनदीत भराव टाकून रस्ता केला जात असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचा ऱ्हास, असे विदारक दृश्य तळेकांटे ते कोळंबे या गावादरम्यान असणाऱ्या नदीत पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने जिल्हा प्रशासनासह संगमेश्वरच्या तहसीलदारांनी पाहणी करून याबाबत कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी जलदूत शहानवाज शहा यांनी केली आहे. तळेकांटे आणि कोळंबे गावाजवळ एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला महामार्ग अशी स्थिती आहे.
नदी बाजूला असल्याने महामार्गाचे रुंदीकरण करताना प्रथम चक्क नदीच्या काही भागात भराव घालण्यात आला. काही कालावधीनंतर या भरावाला संरक्षक भिंत बांधण्याचे काम ठेकेदार कंपनीने हाती घेतले आहे. ही संरक्षक भिंत म्हणजे खरेच एक आश्चर्य असून, अभियंत्यांनी यामध्ये तांत्रिक बाबी तपासल्या का? असा प्रश्न हे काम पाहिल्यानंतर पडतो. संरक्षक भिंत बांधताना काढण्यात आलेली माती आणि दगड थेट नदीत टाकण्यात आले आहेत. मुळातच येथे नदी गाळाने भरलेली असताना हा गाळ काढण्याचे काम राहिले बाजूलाच; मात्र नदीत आणखी भराव टाकून नदीचे अस्तित्वच संपवण्याचा प्रकार महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार यांच्याकडून सुरू आहे.
तळेकांटे आणि कोळंबे या दोन्ही गावांत साधारण एक किलोमिटरच्या परिसरात नदीचे अस्तित्वच संपवण्याचा घाट घातला जात आहे. चौपदरीकरणाचे काम करताना अनेक ठिकाणी नदीत मातीचे ढीग टाकण्यात आले आहेत. नदीलगत ठेवलेले मातीचे ढीग पावसाळ्यात नदीत जाऊन नदी आणखी गाळाने भरणार आहे. तळेकांटे आणि कोळंबे येथे नदीमध्ये भराव टाकण्याऐवजी जर पिलर्स टाकले असते तर नदीचे अस्तित्व कायम राहिले असते आणि कामाचा दर्जाही राखला गेला असता, असे मत व्यक्त केले जात आहे. तळेकांटे आणि कोळंबे गावच्या ग्रामपंचायतींनी नदीत भराव टाकून केले जाणारे काम रोखावे आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला नोटीस द्यावी, अशी मागणी केली आहे.