भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी मंगळवारपासून अतिक्रमणे हटावची मोहीम हाती घेतली. यामध्ये पहिल्याच दिवशी कारवाईत ३५ बेशिस्त दुचाकीस्वारांकडून २० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रिक्षा व्यावसायिकांसाठी जागा निश्चित करून बसफेऱ्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. यामुळे या परिसराने काहीसा मोकळा श्वास घेतला आहे. ही कारवाई बुधवारीही (ता. २) सुरू होती. वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आली. भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीने वाहनचालकांसह पादचाऱ्यांची दमछाक होत होती. यामुळे बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावून अतिक्रमणे हटवण्यासाठी पोलिस निरीक्षक भोयर यांनी पुढाकार घेतला आहे. विशेषतः अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी भरणे ग्रामपंचायतीची असतानाही मंगळवारपासून जादा पोलिसांची कुमक तैनात करत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यास पोलिसांनी सुरवात केली होती.
सलग दुसऱ्या दिवशी ही मोहीम राबविण्यात आली. भरणे येथून शहराच्या ठिकाणी तसेच अन्य ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांसाठी जागेची निश्चिती करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांनाही दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. लांबपल्ल्यासह चिपळूण व आंबवलीच्या दिशेने जाणाऱ्या बसफेऱ्यांचे मार्गही बदलण्यात आले आहे. ये-जा करण्याकरिता एकाच ठिकाणाहून बसचालकांना मुभा देण्यात आली आहे. यामुळे वाहतूक सुरळीत झाली. मंगळवारी (ता. १) पहिल्या दिवशी सर्व हातगाडी, टपऱ्यांचे मालक व फेरीवाल्यांना स्वतःहून अतिक्रमणे हटवून मार्ग मोकळा करण्याच्या सूचना केल्या होत्या; मात्र त्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने बुधवारी (ता. २) ही मोहीम राबवण्यात आली.
मोहिमेत यांचा सहभाग – या मोहिमेत साहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक सुधीर कदम, पोलिस हेडकॉन्स्टेबल साळवी, पोलिस कॉन्स्टेबल राहुल कोरे, प्रकाश पवार यांच्यासह पोलिस कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.