संगमेश्वरमध्ये ६ नोव्हेंबरच्या रात्री गस्ती दरम्यान बोलेरो पिकअप ही गाडी थांबवून झडती घेतली असता त्यांमध्ये ४ संशयित इसमाकडे बंदूक, जीवंत काडतूसे आणि टॉर्च आढळली. या सगळ्या मुद्देमालासह ४ संशयित इसम ांदेखील चौकशीसाठी ताब्यात घेतले. ही सर्व मंडळी ‘शिकारीला निघाली असावीत असा कयास वर्तविण्यात येत आहे. वनखात्याच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. वनखात्याकडून देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार ६ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास मौजे राजवाडी पैकी ब्राम्हणवाडी साईमंदिरासमोर मौजे अणदेरी ते राजवाडी या मार्गावर एक बोलेरो पिकअप व्हॅन आढळली. या गाडीच्या टपावर बसून हॅन्डटॉर्चच्यासाह्याने शिकारीच्या उद्देशाने निघालेल्या चौघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे १२ बोअरची १ बंदुक, ६ जीवंत काडतूसे, २ हॅन्डटॉर्च आढळले. हे सर्व साहित्य आणि गाडीसह चौघांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत संशयित आरोपी म्हणून विश्वनाथ शांताराम मालप (वय-२९, रा. अणदेरी, ता. संगमेश्वर), गजानन मानसिंग इंदुलकर (वय-४३, रा. हेदली, ता. संगमेश्वर), रुपेश धोंडू पोमेंडकर (वय-४१, रा. कारभाटले, ता. संगमेश्वर), राहुल रविंद्र गुरव (वय-२८, तिवरे घेराप्रचितगड, ता. संगमेश्वर) अशी या चौघांची नावे असल्याचे वनअधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
या प्रकरणी संबंधितांवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद केला असून आवश्यक कागदपत्र तयार करून पुढील तपास चालू आहे, ही कारवाई मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर जी. गुरुप्रसाद (भा.व.से) व विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाईसाठी प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, सागर गोसावी वनपाल संगमेश्वर (देवरुख), वनरक्षक सुरज तेली आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे, यांनी ही कार्यवाही केली असुन पोलीस पाटील अणदेरी महेंद्र होडे, पोलीस पाटील राजवाडी विलास राऊत, सुलतान मालगुंडकर, अनंत तोरस्कर यांचे सहकार्य लाभले. अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडत असल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रम किावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी गिरीजा देसाई यांनी केले आहे.

