दादागिरी करीत फुकटचे खाणे नशेबाज तरूणाला महागात पडले आहे. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या कॅफे मालकाने मित्रांच्या मदतीने या तरूणाची चांगलीच धुलाई केली. गजबजलेल्या एस्. टी. स्टँड परिसरात हा प्रकार घडल्याने बघ्यांची मात्र मोठी गर्दी झाली होती. एका बिअर शॉपीत एक तरूण नियमित येत असे. मंगळवारी रात्री उशीरा तो नेहमीप्रमाणे या बिअर शॉपीत आला होता. आपला नेहमीचा कार्यक्रम आटोपून ठरल्याप्रमाणे फुकट खाण्यासाठी बिअर शॉपीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या एका कॅफेमध्ये तो गेला. त्या ठिकाणी त्याने खाण्यासाठी ऑर्डर दिली. मात्र कॅफे मालकाने फुकट मिळणार नाही असे सांगून रोज रोज तुला फुकट कोण देणार? असे बोलताच त्याला राग आला आणि तो कॅफे मालकासोबत दादागिरी करूं लागला.
सततच्या त्रासाला कंटाळलेल्या कॅफे मालकाने आपल्या मित्रांना बोलावून घेतले. कॅफे मालकाचे मित्र आल्यानंतर फ्रि स्टाईल धुलाई सुरू झाली. मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. फुकटात खाणाऱ्या तरूणाला मोफत प्रसाद मिळाला मात्र त्या तरूणाने भलताच ड्रामा करून साऱ्यांचीच घाबरगुंडी उडवली. दादागिरी करून फुकट खाणाऱ्याला फटकावल्यानंतर तो पॅसेजमध्ये आडवा पडला. आपण बेशुद्ध पडलोय असे सोंग त्याने घेताच साऱ्यांची घाबरगुंडी उडाली. काहींनी धावाधाव करून त्याच्या तोंडावर पाणी मारले त्यावेळी तो शुद्धीत असल्याचे दिसून आले. त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेऊन त्याला रूग्णालयात नेले. त्याने मद्य प्राशन केल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. या प्रकाराबाबत पोलिसांनी दखल घेतली असून त्याला मारहाण करणाऱ्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.