मोबाईलवर संपर्क करून मैत्री करतानाच अश्लील फोटो व व्हिडीओ तयार करत ब्लॅकमेल करत पैसे उकळून सोशल मीडिया तसेच पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी दिल्याने मनिष मिलिंद सावंत (१९) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रकार उघडकीस आला असून या बाबत किसनलाल भवरलाल पितर व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार चिपळुणात राहणारा मनिष मिलिंद सावंत या १९ वर्षीय तरुणाला त्याच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीकडून फोनवर संपर्क साधण्यात आला. पुढे मैत्री करण्यात आली. वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून वेगवेगळी आमिषे दाखवत त्याला मैत्रीच्या मोहपाशात ओढण्याचे काम करण्यात आले. तरुण असलेला मनिष सहजपणे त्या मोहपाशात अडकला आणि पुढील इसिप्त साध्य करण्याची संधी अज्ञाताने साधली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फोटो आणि मेसेज – मैत्री घट्ट झाल्यानंतर मनिषला काही अश्लील मेसेज टाकण्याचे काम करण्यात आले. त्याला प्रतिसाद मिळताच समोरच्यांनी संधी साधण्यास सुरुवात केली. त्याचे मेसेज आणि फोटोचा अश्लील व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर तसेच युट्युबवर अपलोड करण्याची धमकी देण्याचे सत्र सुरू झाले. जर ते नको असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे सांगत मनिषकडून तब्बल ११ हजार ५०० रुपयांची मागणी करण्यात आली. ती मागणीदेखील मनिषने पूर्ण केली, अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली.
गुगलचा संदर्भ आणि.. – पैसे घेऊन देखील त्यांचे समाधान झाले नाही. काही दिवसांनी पुन्हा मनिपला संपर्क साधून आम्ही गुगल वरून बोलतोय, तुमचे सर्व फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू तसेच पोलीस ठाण्यात देखील तुमची तक्रार केली जाईल. या धमकीने मनिष पुरता घाबरला, तो प्रचंड तणावाखाली आला होता. मानसिक स्थिती ढासळली, आता कुठे तारुण्यात आलेला मनिष कासावीस झाला आणि पुढे नको तेच घडले.
गळफास घेऊन आत्महत्या – सतत येणाऱ्या धमक्यामुळे तणावात असलेल्या मनिषने अखेर ९ ते १० ऑगस्ट दरम्यान तिवरे येथील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आणि स्वतःला संपवून घेतले. त्याचा मोबाईल त्याच ठिकाणी ‘शेतात सापडला. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे गूढ उकलण्यास मदत झाली. मयत मनिषचा भाऊ आकाश सावंत याने शिरगाव अलोरे पोलीस ठाण्यात याबाबत रितसर फिर्याद दिली असून त्यानुसार आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून किसनलाल भवरलाल पितर (रा. राजस्थान) तसेच अन्य एकावर ३०६,३८४ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. दरम्यान मनिषसारख्या मनमिळावू, शांत संयमी तरुणाने. अशा प्रकारे आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.