राज्यभरातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहनमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठकीत वर्षभरासाठी मोफत पास जाहीर करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागणीला न्याय दिला. याबद्दल सेवानिवृत्तांच्या संघटनेने आभार मानले. राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटना वर्षभराच्या पासासाठी गेली कित्येक वर्षे महामंडळाकडे मागणी करत होती. सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा करून तो ९ महिन्यांचा संघटनेने करूनही घेतला होता; परंतु हा पास वर्षभरासाठी व्हावा, ही मागणी संघटनेचे सरचिटणीस सदानंद विचारे यांनी वर्षभर लावून धरली होती. संघटनेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. बैठकीला निवृत्त संघटनेच्या वतीने सरचिटणीस सदानंद विचारे, कोषाध्यक्ष गणेश वायफळकर उपस्थित होते. कर्मचारी व त्यांच्या पत्नीसाठी वर्षभरासाठी मोफत पास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करताच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेला विशेष निमंत्रित करून परिवहनमंत्र्यांनी जो ज्येष्ठांचा सन्मान केला त्याबद्दल विचारे यांनी परिवहन मंत्र्यांचे आभार मानले असल्याचे प्रसिद्धी सचिव रत्नपाल जाधव यांनी सांगितले. सरचिटणीस विचारे यांनी प्रलंबित प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी केली व एसटीने सेवाशुल्क न भरल्यामुळे पेन्शनचे दावे कसे प्रलंबित आहेत, हे मंत्र्यांना पटवून सांगितले. प्रलंबित पेन्शनच्या दाव्यांसाठी सरकार पातळीवर स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असा शब्द मंत्र्यांनी संघटनेला दिला आहे. १२ जूनला एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासोबत संघटनेची सविस्तर बैठक असल्याचे विचारे यांनी सांगितले.