गुहागर-विजापूर राष्ट्रीय मार्गावरील कोंढे-बौद्धवाडीसमोर मोरी दोन्ही बाजूंनी खचली आहे. तेथे दोन मोठे खड्डे पडले आहेत, तर कोंढे-कळवंडे मार्गावरील रिगल कॉलेज परिसरात रस्त्यावरची लोखंडी जाळी वर आल्यामुळे वाहने चालवणे धोकादायक बनलेले आहे. शिवाय पादचाऱ्यांनाही त्याचा धोका निर्माण झाला असल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झालेले आहेत. तालुक्यातील कोंढे-बौद्धवाडी येथून वाहणारा वाघपऱ्या काही अंतरावर असणाऱ्या मुख्य नदीला जाऊन मिळतो. याच परिसरातून गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने त्या ठिकाणी मोरी ठेवण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी ही मोरी खचण्याचा प्रकार घडला होता. तेथे एका वाहनाचा अपघात होऊन त्या मोरीची दुरवस्था झालेली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या मोरीची दुरुस्तीही केली होती; मात्र अलीकडच्या काही दिवसांत ही मोरी दोन्ही बाजूंनी पुन्हा खचली तसेच त्या परिसरात दोन मोठे खड्डे पडले आहेत.
पावसाळ्यात खड्ड्यांची रुंदी वाढून या मार्गावरची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. मुळातच गुहागर पर्यटनस्थळ असल्याने या मार्गावरून पर्यटकांसह एसटी बसेस, ट्रक व काही मोठ्या कंपन्यांमुळे मोठे ट्रक अशी शेकडो वाहने दररोज धावतात. त्यामुळे मोरी आणखी खचून तसेच खड्डे पडून अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या पाऊस पडत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने मोरीचे काम हाती घेऊन ते तातडीने मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. याच भागापासून काही अंतरावर असणाऱ्या रिगल कॉलेज येथील कोंढे-कळंवडे रस्त्यावरही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी जाण्यासाठी या मार्गावर गटार ठेवण्यात आले आहे. त्यावर लोखंडी जाळी बसवण्यात आली होती; मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.