काही अतिउत्साही पर्यटक समुद्राच्या पाण्यापर्यंत चारचाकी वाहने घेऊन जात आहेत. त्यांचा हा स्टंट अडचणीचा ठरत असून, वाहने वाळूत अडकत आहेत. गेल्या चार दिवसांत आरे-वारेमध्ये पाच ते सहा गाड्या स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या; परंतु आज पुन्हा किनाऱ्यावर २२ वाहने उभी आहेत. याकडे जिल्हा प्रशासनासह पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वादळी पावसाच्या इशाऱ्यामुळे मे महिन्याच्या पंधरवड्यातच जिल्ह्यात आलेले पर्यटक माघारी फिरले. मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांवर पुन्हा पर्यटकांनी गर्दी केली आहे. विशेषतः रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर मागील दोन दिवसांपासून पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे; परंतु पर्यटक नियमांची पायमल्ली करून समुद्रात उतरत आहेत.
बुधवारी आरे समुद्रकिनारी पर्यटकांची दोन वाहने वाळूत रूतली. क्रेनच्या मदतीने ही वाहने बाहेर काढण्यात आली. गुरुवारी दुसऱ्या दिवशी देखील आरे-वारे किनारी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. पर्यटकांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजूला उभी न करता थेट समुद्रकिनारी उतरवली होती. अनेकांनी तर समुद्राच्या पाण्यापासून अवघ्या काही अंतरावर आपली वाहने उतरवली. येथील स्थानिक प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी सूचना करूनदेखील पर्यटकांनी याकडे दुर्लक्षच केले. पावसाळ्याच्या कालावधीत समुद्र खवळलेला असतो. या कालावधीत कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची भीती असते. त्यामुळे प्रशासनाने आरे-वारे समुद्रकिनारी सुरक्षिततेच्या उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी होत आहे.