मुंबईत शुक्रवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे, राज्य सरकारने कॅसिनो कायदा रद्दा केला आहे. त्याचबरोबर यावर्षी गौरी-गणपती आणि दिवाळीसाठी १०० रूपयात आनंद्राचा शिधा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवर कॅसिनो सुरु करण्याचा विचार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रात कॅसिनोची घाण नकोच, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानुसार, आता कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
गौरी-गणपतीला आनंदाचा शिधा – याशिवाय आगामी काळातील गौरी-गणपती उत्सावासह दिवाळीत नागरिकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे. अवघ्या १०० रूपयात १ किलो साखर, १ किलो रखा, १ किलो चणाडाळ आणि १ किलो तेल/डालडा अशा वस्तू रेशनकार्डधारकांना देण्यात येणार आहेत. मागील वर्षी हा शिधा दिवाळी संपली तरी अनेकांना मिळाला नव्हता. त्यानंतर गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंती या २ सणांसाठी आनंदाचा शिधा देण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. त्याच्या अंमलबजावणीत देखील अनेक त्रुटी राहिल्याने त्यावेळीदेखील हा शिधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नव्हता. आता गौरी- गणपती सणाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा आनंदाचा शिधा देण्याची घोषणा सरकारने केली आहे. गणपती कृपेने ती पूर्ण होईल, अशी अपेक्षा बाळगायची
का? असा खोचक सवाल उपस्थित केला जात आहे.
मंडणगडमध्ये दिवाणी न्यायालय – रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामध्ये दिवाणी न्यायालय उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.