दापोलीतील बहुचर्चित निलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे गूढ आता हळूहळू उलगडू लागले असून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली स्टेट बँकेतील प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याला पोलिसांनी गुरूवारी रात्री रत्नागिरीमधून अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दापोली येथील स्टेट बँकेमध्ये निलिमा चव्हाण कंत्राटी पद्धतीवर कामला होती.
संग्राम गायकवाड हा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहत होता आणि तो तिच्यावर टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत होता, अशा आशयाची फिर्याद निलिमाचे वडील सुधाकर चव्हाण (रा. ओमळी, ता. चिपळूण) यांनी नोंदवताच पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून संग्राम गायकवाडला अटक केली आहे. त्यामुळे या मृत्यूचे गूढ आता हळूहळू उलगडू लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दाभोळ खाडीत मृतदेह – अधिक वृत्त असे की, १ ऑगस्ट रोजी दाभोळ खाडीतील उसगांव येथे एक मृतदेह मिळाला. तपासाअंती हा मृतदेह निलिमा चव्हाणचा असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला. मात्र निलिमाचा मृत्यू हा नैसर्गिक नसून घातपात आहे असा संशय तिच्या कुटुंबियांसह तिच्या मूळ गावातील म्हणजेच ओमळीमधील समाजबांधवांनीदेखील केला होता. पोलीस तपास करत होते.. तपासात प्रगती होत नव्हती. मात्र
घातपात नाही – शवविच्छेदनानंतर निलिमाचा मृत्यू हा घातपात नसल्याचा निर्वाळा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद बोलावून दिला होता. तरीही सर्व बाजुंनी तपास केला जाईल, असे त्यावेळी सांगण्यात आले. , निलिमाच्या व्हिसेराचा अहवाल हाती आल्यानंतर तिच्यावर कोणताही विषप्रयोग झाला नसल्याचे नपढे आले. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये पाण्यात बुडून मृत्यू असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र निलिमाच्या कुटुंबियांचा संशय दूर होत नव्हता. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारणही पुढे येत नव्हते.
कसून तपास – पोलिसांनी चौहोबाजूंनी तपास केला. चिपळूण, खेड आणि दापोली येथील एसटी स्थानकं, रेल्वे स्थानकांसह ठिकठिकाणच्या शेकडो सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. दरम्यान, हा तपास सुरू असतानाच निलिमाचे वडील सुधाकर चव्हाण यांनी चिपळूण पोलीस स्थानकात १७ ऑगस्ट रोजी निलिमाला आत्म हत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा दावा करत यामागे स्टेट बँकेतील प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड असल्याची फिर्याद दिली होती. चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपासासाठी दाभोळ पोलिसांकडे वर्ग केला.
टार्गेटसाठी दबाव – निलिमाचे वडील सुधाकर चव्हाण यांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये असे नमूद केले होते की, १५ एप्रिल २०२३ ते २९ जुलै २०२३ या काळात त्यांची मुलगी निलिमा दापोलीमध्ये ज्या बँकेत काम करत होती त्या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून संग्राम गायकवाड (मूळ रा. कोल्हापूर) हादेखील काम करत होता. आपल्या दैनंदिन कामकाजातील रिपोर्टिंग गायकवाडला निलिमा चव्हाणला करावे लागत असे.
खाती उघडण्यासाठी टार्गेट – प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने निलिमावर डीमॅट खाती उघडण्यासाठी अशक्य टार्गेट देत दबाव आणला होता, असा आरोपदेखील फिर्यादीमध्ये करण्यात आला होता. हे टार्गेट पूर्ण होण्यासाठी संशयित आरोपी संग्राम गायकवाड निलिमाला सातत्याने फोन करत होता. ती सुटीवर असतानादेखील वारंवार फोन केले जात होते. दिवसाला ४ ते ५ डीमॅट खाती उघडण्यासाठी तिच्यावर गायकवाड दबाव आणत होता, असा आरोप निलिमाच्या वडिलांनी फिर्यादीमध्ये केला आहे. जाणुनबुजून हा दबाव आणला जात असल्याने निलिमा तणावाखाली होती. टार्गेट पूर्ण न झाल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकीदेखील तिला देण्यात आली होती, असे तिच्या वडिलांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
तणाव असह्य – त्यामुळे निलिमा चव्हाण चिंताग्रस्त आणि दबावाखाली होती. तिचा भाऊ अक्षय चव्हाण याच्याशी ती याबाबत बोलली होती. घरामध्ये नीट ती जेवत नव्हती. त्यामागे आरोपी संग्राम गायकवाड सातत्याने दबाव आणत असल्याचेच कारण होते अशी फिर्याद सुधाकर चव्हाण यांनी नोंदवली होती.
आरोपीला अटक – या फिर्यादी आधारे संग्राम गायकवाडविरोधात भा.दं.वि.क. ३०६ अन्वये आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन एकप्रकारे प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी रात्री संशयित आरोपी संग्राम सुरेश गायकवाड (वय २६, मूळ रा. कोंडोली, जि. कोल्हापूर, सध्या रा. रत्नागिरी) याला अटक करण्यात आली. अधिक तपास दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते करत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी संग्राम गायकवाड याला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असत १ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आल आहे.