रत्नागिरी तालुक्यातील गावखडी-ब्राह्मणवाडी परिसरातील खारलॅण्ड बंधाऱ्याची झडपे कट करण्यात आल्याने खारे पाणी मोठ्या प्रमाणात शेतामध्ये जात आहे. त्याचप्रमाणे परिसरातील पाण्याचे स्त्रोत मुख्य करून विहिरीचे पाणी खारट झाले असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे हि तुटलेली झडपे त्वरित बसवण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
या परिसरात खाडीचे पाणी जात असल्यामुळे तो परिसर नापिक बनला; परंतु खारभूमी विभागाने या ठिकाणी बंधारा बांधल्यामुळे या भागातील जमीन सुपीक बनली होती व बेचव असलेले विहिरीचे पाणी पुन्हा चांगल्या तऱ्हेने उपयोगात येऊ लागले होते; परंतु काही मच्छीमारांनी आपल्या व्यवसायासाठी बंधाऱ्यावर खारे पाणी थांबविण्यासाठी टाकण्यात आलेली झडपे वारंवार तोडत असल्याने खाडीचे खारे पाणी व मच्छी मोठ्या प्रमाणात या परिसरात जात आहे. त्यामुळे या भागातील विहिरीचे पाणी खारट होत आहे.
त्यामुळे येथील नागरिकांना दुसऱ्या भागातून पिण्याचे पाणी आणण्याची वेळ आली आहे. या लोकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहेत. तापी योजनेवरील दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी शहरातील काही भागांमध्ये अद्यापही पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी मोठी कसरत पाहायला मिळत आहे.
दोन वर्षांपूर्वी संबंधित खारभूमी अधिकारी यांनी आमदार उदय सामंत यांच्या निधीतून झडपे बसवण्याचे काम केले होते. त्यामुळे खारे पाणी बंद झाले होते; परंतु मासेमारीसाठी ही झडपे पुन्हा झडपे तोडण्यात आली. या परिसरामध्ये पाच ते सहा एकरमध्ये खारे पाणी जात असून या भागात १५ ते २० घरे लगत असल्याने त्यांच्या विहिरीचे पाणी खारट झाले आहे. पिण्याच्या पाण्याचे देखील हाल झाले आहेत. झडपे तोडण्याच्या प्रकाराबाबत आम्ही सर्व बाधित लोक संबंधित खारभूमी अधिकारी व दुरुस्ती करिता लागणाऱ्या निधीसाठी आमदार उदय सामंत यांची भेट घेणार आहेत. अनेकदा दुरुस्ती करून देखील वारंवार झडपे तोडण्याच्या प्रकाराबाबत त्यांचे लक्ष वेधणार आहोत.