वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्या युवतीच्या बाबतीत संबंधित डॉक्टरने हेतुपूर्वक विनयभंगाच्या कृती केल्याच्या प्रकाराने कोकण रेल्वेच्या राजापूररोड स्थानकानजीकच्या एका गावात प्रक्षोभ निर्माण झाला. संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या जमावाने बुधवारच्या मध्यरात्री शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक वर्षे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरला चांगलाच ‘प्रसाद’ दिला. त्या नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात नेऊन दिले. रात्री उशीरा घडलेल्या या प्रकाराची शहरात दिवसभर चर्चा सुरु होती. याबाबत मिळालेल्या विश्वसनीय माहितीनूसार राजापूररोड रेल्वें स्थानकाकडे जाणाऱ्या एका मार्गावरील एका, कुटुंबाचा संबंधित डॉक्टर हा फॅमिली डॉक्टर आहे.
पिडित तरूणी राजापूरातील एका दुकानात काम करून आपल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत आहे. बुधवारी सायंकाळी पिड़ित तरूणीला तापासारखी कणकण जाणवल्याने ती आपले कौटुंबिक डॉक्टर म्हणून संबंधिताच्या खासगी दवाखान्यात आपल्या भावासोबत गेली होती. त्या डॉक्टरने तीची वैद्यकीय तपासणी करून तीला सलाईन लावण्याची गरज असल्याचे सांगीतले. तोवर तपासणी कक्षाच्या बाहेरील बेडवर पडून राहण्यास सांगीतले. दरम्यान संबंधित युवतीच्या भावाला मेडिकल स्टोअरमधून सलाईन आणण्यास सांगीतले.
पिडीत तरूणीचा भाऊ बाहेर निघून गेला असता त्या दरम्यानं त्या डॉक्टरने पिडीत तरूणीशी अश्लिल प्रकार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दरम्यानच या प्रकाराने गर्भगळीत झालेली पिडीत तरूणी संबंधित डॉक्टरच्या हिडिस कृत्याने रडतरडत येऊन घाटीवर रडत बसली होती. सलाईनची बॉटल घेऊन आलेल्या भावालाही कोणताही प्रकार न सांगता ती घरी गेली तिथे तीने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आईने प्रमुख ग्रामस्थ व वाडीप्रमुख यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यानंतर गावातील एका मुख्य नाक्यावर सगळी प्रमुख मंडळी जमली.
त्यांनी माजी सरपंचांच्या कानावर ही बाब घातली. जमलेले सगळे ग्रामस्थ थेट राजापूर पोलिस स्थानकात पोहोचले. तेथे आधी ही बाब पोलिसांच्या कानावर घालण्यात आली. आधी पोलिसांनी नव्या नियमांचा आधार सांगत अशा तक्रारी दाखल करतांना मोठी प्रक्रीया पार करावी लागत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी संबंधित डॉक्टरला थेट पोलिस ठाण्यांतच आणल्याने पोलिस यंत्रणने त्यानंतर गुन्ह्याची चौकशी सुरू केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान संबंधित डॉक्टरने पोलिस स्थानकात गयावया केल्याचे व आपल्या विरोधात तक्रार असेल तर आपला काही बचाव नसल्याचे सांगितल्याची माहिती हाती आली आहे. राजापूर पोलिस स्थानकातून संबधित डॉक्टर विरोधात भारतीय न्याय संहिता ७५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगण्यात आले.