29.1 C
Ratnagiri
Sunday, February 25, 2024

बहुजनांनी ओबीसी झेंड्याखाली एकत्र यावे – चंद्रकांत बावकर

कुणबी समाजासह ओबीसी समाजाच्या विकासासाठी संघटन होण्यासह...

सहा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार

कृषी, कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय...

रत्नागिरी ‘लायन्स क्लब’च्या डायलिसिस सेंटरचा प्रारंभ

लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालित यशस्वी नेत्र रुग्णालयानंतर...
HomeSindhudurgतळकोकणात दोन टप्प्यांत गोवर रुबेला लसीकरण मोहीम

तळकोकणात दोन टप्प्यांत गोवर रुबेला लसीकरण मोहीम

मुलांना ताप येणे व अंगावर लाल रंगाचा पुरळ येणे ही गोवरची प्रमुख लक्षणे आहेत.

राज्यात सगळीकडे गोवरची साथ आली असून, हळू हळू साथ पसरू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ ते २५ डिसेंबर आणि १५ जानेवारी ते २५ जानेवारी या दोन टप्प्यांत गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये लसीपासून वंचित राहिलेल्या मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांनी आज दिली. या मोहिमे दरम्यान मुलांना गोवर रुबेला लसीकरणाचा डोस देऊन आपल्या मुलांना गोवर रुबेला या आजारापासून संरक्षित करण्याचे आवाहन केले गेले आहे.

मुलांना ताप येणे व अंगावर लाल रंगाचा पुरळ येणे ही गोवरची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास आपल्या मुलांना घेऊन तत्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरणाचे काम सुरू असून नोव्हेंबर अखेर ४२४० मुलांना पहिला डोस, तर ४०१५ मुलांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच गोवर रुबेला लसीकरणाबरोबरच ”अ” जीवनसत्वाचा डोस देण्यात आला आहे. यामध्ये ९ महिने ते ११ महिने वयोगटातील बाळांना पहिला आणि १६ ते २४ महिने वयोगटातील मुलांना दुसरा डोस देण्यात येत आहे.

गोवर रुबेला लसीकरण २६ जानेवारीपर्यंत १०० टक्के मुलांना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ज्या मुलांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही, अशा वंचित मुलांसाठी १५ ते २५ डिसेंबर या कालावधीत पहिला टप्पा आणि १५ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यांत विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. अद्यापही ज्या मुलांचे गोवर रुबेला लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस घेणे शिल्लक आहे, अशा वंचित मुलांच्या पालकांनी आपल्या बाळाला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. धुरी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular