मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छीमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी शासन अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे गतीने करावीत, असे निर्देश मंत्री नीतेश राणे यांनी दिले. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिकांच्या व बंदरांच्या उद्भवणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री नीतेश राणे यांनी बैठक घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, मत्स्य व्यवसाय सचिव एन. रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, एमएफडीसीच्या कार्यकारी संचालक अनिता मेश्राम, मत्स्य व्यवसाय सहआयुक्त युवराज चौगुले, उपायुक्त ऋता दीक्षित, उपसचिव किशोर जकाते आदी उपस्थित होते.
शासनाने मच्छीमारांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीचे बांधकाम, लाटरोधक भिंती, नौकानयन मार्गातील गाळ काढणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ही कामे गतीने पूर्ण व्हावीत. मच्छीमारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास निधी विहित वेळेत खर्च करण्यात यावा, अशा सूचना मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठे बंदर म्हणून मिरकरवाडा बंदराची ओळख आहे. तेथील अनिधकृत बांधकामं हटवल्यामुळे जागा मोकळी झाली असून, तिथे टप्पा २ मधील कामांनाही लवकरच सुरवात होणार आहे. त्याचबरोबर नाटे येथील बंदराच्या विकासाची कामे सुरू झालेली आहेत. या कामांना गती मिळण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीमुळे चालना मिळणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
अनधिकृत बांधकामांवर टाच – मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील बंदर परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामांची यादी करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाहीही सुरू आहे. बंदरांचा विकास करण्यासाठी परिसर मोकळा करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने मंत्री राणे यांच्या सूचना महत्वपूर्ण असून मत्स्य विभागही कामाला लागलेला आहे.