“मला हलक्यात घेऊ नका” असे वारंवार सांगणाऱ्या उप मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे. याआधी फडणवीसांनी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली होती. त्यावरुन महायुतीत शीतयुद्ध सुरु झाल्याची चर्चा रंगली असतानाच शिंदेच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नियम डावलून मंजूर केलेल्या ३,२०० कोटी रुपयांची कामे रद्द केली आहेत. दरम्यान हा निर्णय घेतल्याबद्दल ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करत महायुतीत सुरु असलेल्या संघर्षात शिंदेंना चांगलेच डिवचले आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे सरकारच्या काळात आरोग्य विभागासाठी घेतलेला निर्णय स्थगित करण्यात आला आहे. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या काळात दिलेले ३,२०० कोटी रुपयांचे काम रद्द करण्यात आले आहे.
अनियमिततेचा आरोप – एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तानाजी सावंत यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी होती. यावेळी अधिकाऱ्यांच्या बदल्या, रुग्णवाहिका खरेदी यामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप केला गेला होता. तसेच आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणारी सर्व शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे यांना बाह्य यंत्रणेद्वारे सापसफाई करण्याचे काम देण्यात आले होते. यासाठी प्रतिवर्षी ६३८ कोटी रुपये याप्रमाणे तीन वर्षांसाठी ३,१९० कोटी रुपयांचे कंत्राट पुण्यातील एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. मात्र या कंत्राटाला आता स्थगिती देण्यात आली आहे.
नियमानुसारच काम व्हावे – दरम्यान या निर्णयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेले सुप्त द्वंद कारणीभूत असल्याचा संशय विरोधक व्यक्त करत आहते. पण शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सदर निर्णयामागे पक्षीय कारण नाही. फक्त आरोग्य विभागच नाही तर प्रत्येक सरकारी विभागाने नियमानुसार काम केले पाहीजे. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत.
राऊतांकडून स्वागत – दरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या काळात जी कामे झाली, त्यात केवळ भ्रष्टाचारच झाला. शिंदेंच्या काळात आरोग्य मंत्री कोण होते, हे सर्वांना माहीत आहे. भाजपातून भ्रष्ट मंत्र्यांचा विरोध केले गेला होता त्यापैकीच एक आरोग्य मंत्रीही होते. सार्वजनिक आरोग्य खाते थेट जनतेशी संबंधित असते. पण त्या खात्यात भ्रष्टाचार होत ‘असेल तर योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा भ्रष्टाचार थांबवत असतील तर त्यांचे आम्ही स्वागतच करू.